Connect with us

गोवा खबर

गोव्यात सुलभ आरोग्य सेवा निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट :आरोग्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर:परिचारीका शिक्षण संस्थेने आज दोनापावल येथील राजभवनात प्री-ग्रॅज्युएशन आणि वार्षिक दिवस आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्ग यांच्यासमोर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आरोग्यमंत्री श्री विश्वजित प्रतापसिंह राणे यांनी उत्तम दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यात परिचारिकांचा मोठा वाटा आहे असे सांगितले. ते म्हणाले की सरकार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आणि विशेष प्रशिक्षण देण्यासह नर्सिंगमध्ये अतिरिक्त अभ्यासक्रम तयार करण्यावर भर देत आहे.

ते म्हणाले, “गोव्यात सुलभ आरोग्य सेवा निर्माण करणे आणि लोकांना गोव्याबाहेर जावे लागणार नाही यासाठी राज्यातील शस्त्रक्रिया करण्यासाठी संस्थांशी करार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आम्ही तुम्हाला या क्षेत्रात संधी देण्यासाठी उपलब्ध आहोत. राज्य या क्षेत्रात चांगले काम करीत आहे आणि विविध मार्गांनी प्रगती करीत आहे असे  मंत्री म्हणाले.

            गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इस्पीतळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी यावेळी बोलताना नर्सिंग एज्युकेशन संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच पदवीदान समारंभ होत आहे असे सांगितले. आम्ही नर्सिंग शिक्षणामध्ये अलीकडील प्रगतीचा तसेच सर्वोत्तम पद्धती आणि सक्षमतेवर आधारित नर्सिंग शिक्षणाचा समावेश केला आहे असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य सेवा संचालनालयाचे   संचालक डॉ. गीता काकोडकर यांनी नवीन नर्सिंग पदवीधरांना रुग्ण तुमच्याकडे आशेने पाहतात. केवळ औषधेच त्यांना बरे बनवितात असे नाही तर करुणा, सहानुभूती आणि आदर ही रूग्णांना त्यांच्या पुनर्प्राप्तीमध्ये मदत करतात असे सांगितले.  त्या पुढे म्हणाल्या की, केवळ रुग्णालयांमध्येच नव्हे तर आरोग्य सेवा संचालनालया अंतर्गत आयुष्मान भारत मिशन अंतर्गत नर्सिंग पदवीधरांसाठी मोठा वाव असल्याचे सांगितले.

प्रोफेसर आणि प्रमुख, संशोधन आणि सहयोग, मणिपाल कॉलेज ऑफ नर्सिंग मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन मणिपाल, डॉ एनिस जॉर्ज यांनी पदवीधरांना सांगितले की पालक आणि शिक्षकांना त्यांच्या मुलाच्या/विद्यार्थ्यांच्या यशाचा नेहमीच अभिमान असतो. आंतर-व्यावसायिक सराव जेथे आरोग्य सेवेतील प्रत्येकजण एक संघ म्हणून काम करतो त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. जर तुम्ही ठरवले असेल तर परदेशात जा, पण एकदा तुम्ही शिकण्याचे आणि कमावण्याचे तुमचे ध्येय गाठले की, तुमच्या देशात नवीन शिकण्याचा अनुभव घेऊन परत या. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कारण तुम्हाला आजारी व्यक्तींची काळजी घ्यायची असेल तर ते महत्त्वाचे आहे असे त्या म्हणाल्या.

 यावेळी गोवा नर्सिंग कौन्सिलचे निबंधक डॉ फ्लॉसी रॉड्रिग्ज ई मिनेझिस, प्रोफेसर, आयएनई, बांबोळी,  प्रा.डॉ. आना वाझ डी ब्रागांजा व इतर उपस्थित होते.

सुरवातीस  प्राचार्य, आयएनई, बांबोळी, प्रा डॉ विल्सन फर्नांडिस यांनी उपस्थितांचे स्वागत केले.