गोवा खबर : विद्यार्थ्यांनी आपल्या जन्मजात क्षमतेवर विश्वास ठेवून उद्योजकतेचे कौशल्य विकसित करून समाजात मानाचे स्थान निर्माण करावे, असे आवाहन जलसिंचन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले आहे. आसागाव येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालय व संशोधन केंद्र संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
गोव्यात राबविण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तरुणांमध्ये गतिमानता आणण्यासाठी बहुआयामी अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे. आता विद्यार्थ्यांनी योग्य पध्दतीने ज्ञान आत्मसात करून आपली करिअर घडवावी आणि नोकरीच्या शोधात न जाता स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
“केवळ कठोर परिश्रम तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाऊ शकतात. तुमच्या स्वानुभवाच्या जोरावरच तुम्ही नवीन मार्ग घडवू शकता. तुमच्या मनाची ताकदच तुम्हाला उंची गाठण्यास मदत करेल” असे ठोस प्रतिपादन श्री. शिरोडकर यांनी केले.

शिक्षण तरुण मनांना कसे सक्षम बनवते हे विशद करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपली ऊर्जा समर्पित केली तर काहीही अशक्य नाही. आपण स्वतः अगदी लहान वयातच व्यवसायात कसे उतरलो याचा स्वानुभव सांगतानाच जीवनात स्वत:ला स्थापित केल्यानंतर समाजाच्या विकासासाठी योगदान द्या असाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपण आज अभियांत्रिकी आणि होमिओपॅथी क्षेत्रात शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था याच भावनेने स्थापन केल्या आहेत हेही त्यांनी आवर्जून सांगितले. “तुमच्या अनुभवाने, सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी इतरांसाठी एक उदाहरण बना” असाही संदेश त्यांनी यावेळी दिला.

ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे यांनी यावेळी बोलताना ज्ञानप्रसारक मंडळाच्या स्थापनेपासून संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात विशेष स्थान निर्माण करण्याचा केजी ते पीजीपर्यंतचा प्रवास सांगितला. संस्थापकांनी स्थापित केलेल्या मूल्यांचे अनुकरण करून सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्र उभारणीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कठोर परिश्रमाचे आणि वचनबद्धतेचे त्यांनी कौतुक केले. बांदेकर कॉलेज ऑफ कॉमर्सपासून डीएम कॉलेजमध्ये झालेल्या परिवर्तनावर त्यांनी प्रकाश टाकला. श्री. पोकळे यांनी शिवग्राम एज्युकेशन सोसायटी आणि तिचे संस्थापक श्री. सुभाष शिरोडकर यांच्याशी समानता दाखवून शिक्षणाप्रती त्यांच्या सामाईक बांधिलकीवर जोर दिला.
प्राचार्य प्रा. डी. बी. आरोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि श्री शिरोडकर यांच्या दूरदर्शीपणाबद्दल आणि विशेषत: त्यांच्या मतदारसंघात बदल घडवून आणणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे मनापासून कौतुक केले. त्यानंतर त्यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
देशातील पहिल्या 150 महाविद्यालयांमध्ये आपल्या महाविद्यालयाचा क्रमांक असल्याचे सांगून त्यांनी महाविद्यालयाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. आपल्या महाविद्यालयाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कित्येक आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये पारितोषिके जिंकली असून त्यात हल्लीच गोव्यात झालेल्या नॅशनल गेम्सचाही समावेश आहे हे त्यांनी अभिमानाने नमूद केले. कॉलेजच्या सुरळीत कामकाजासाठी व्यवस्थापन, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहकार्याचेही त्यांनी कौतुक केले.
मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. एम. शांती यांनी करून दिला. सरचिटणीस श्री. श्रेय़ गडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लिओनार्डो देव, सुश्री रजिएला डिसूझा, सुश्री श्रुतिका मोरजकर आणि अमृता बी ह्या विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सौ. रश्मी रेडकर आणि श्री चंद्रू गोवेकर या प्राध्यापक सदस्यांच्या नेतृत्वाखाली सुंदर नृत्यदिग्दर्शित केलेला देशभक्ती यासंकल्पनेवरचा कार्यक्रम सर्वात रोमांचक होता. कु. उत्कर्षा रेवोडकर आणि कु. अमिषा पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले.