Connect with us

गोवा खबर

न्यायालय, क्लब या ठिकाणी वस्त्रसंहिता हवी; मग मंदिरातच का नको ? : शेफाली वैद्य

Published

on

Spread the love

गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषद

गोवा खबर: न्यायालयात जाण्यासाठी, कामावर जाण्यासाठी, क्लब मध्ये, स्विमिंग पूल मध्ये अशा सर्वच क्षेत्रामध्ये वस्त्रसंहिता लागू आहे, तर मग मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू केल्यास त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातो, असे म्हणून विरोध का केला जातो. इतर ठिकाणी वस्त्रसंहितेला विरोध होत नाही. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केल्यास मंदिरांची सात्विकता टिकून रहाण्यास साहाय्य होईल. हा उपक्रम सर्वत्र राबवला पाहिजे, असे आवाहन ‘सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर’ तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ सौ. शेफाली वैद्य यांनी म्हार्दाेळ येथे आयोजित गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेत बोलतांना केले. म्हार्दाेळ येथे श्री महालसा मंदिर परिसरातील सिंहपुरुष सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी परिषदेमध्ये विविध उद्बोधन सत्रे आणि परिसंवाद संपन्न झाले.

उद्बोधन सत्रात उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संतोष रिवणकर, बेंगळुरूस्थित ‘हू व्हीआर्’ या आस्थापनाचे संस्थापक आणि मुख कार्यकारी अधिकारी अजित पद्मनाभ,  प्रसिद्ध वास्तूविशारद श्री. अभिजीत साधले, अधिवक्ता  श्री. सुरेश राव, केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानचे सचिव श्री. राजेंद्र देसाई, हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक आणि महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या श्वेता क्लार्क यांनी मंदिराशी निगडित विविध विषयांवर मार्गदर्शन केले.  परिषदेत ‘पुरातत्व विभाग आणि मंदिर’ याविषयावर परिसंवाद झाला. जुने गोवे येथील ऐतिहासिक ‘हातकातरो खांबा’ला संरक्षण स्मारक म्हणून घोषित करणार का? असा प्रश्न परिसंवादात उपस्थित झाला. जनभावना जाणून घेऊन आणि यासंबंधी आलेल्या निवेदने यांवरून सरकार ‘हात कातरो’ खांब संरक्षण स्मारक लवकरच घोषित करण्याची शक्यता असल्याचे पुरातत्व संशोधक श्री. वरद सबनीस यांनी या वेळी सांगितले.

शेवटी परिषदेच्या समारोप सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु निलेश सिंगबाळ यांनी गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेच्या माध्यमातून विविध मंदिरांच्या विश्वस्तांमध्ये जवळीक आणि ओळखी वाढण्यास साहाय्य झाले आहे आणि हीच परिषदेची मोठी फलश्रूती असल्याचे म्हटले. विश्व हिंदु परिषदेच्या मठ, मंदिर, पुरोहित आणि अर्चक विभागाचे दक्षिण गोवा विभाग प्रमुख श्री. श्याम नाईक यांनी अयोध्या येथे प्रभु श्रीराम यांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा सर्वांनी साक्षीदार होण्याचे आवाहन केले.

धर्मरक्षणार्थ कार्य करणार्‍या बजरंग दलाच्या या कार्यकर्त्यांचा परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. परिषदेमध्ये पुढील ठराव घेण्यात आले. पोर्तुगीज कालीन उद्ध्वस्त करण्यात आलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, पौराणिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या; परंतु प्रशासन आिण पुरातत्त्व विभाग यांकडून दुर्लक्षित मंदिरांचा तात्काळ जीर्णोद्धार करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी आणि राज्यातील गडकिल्ल्यांवरील घुमट्या, मंदिरे तसेच पुरातत्व खात्याच्या अधीन असलेल्या मंदिरे यांच्या रक्षणाचे दायित्व सरकारने घ्यावे, असे ठराव गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेच्या अखेर तीन वेळा ‘ॐ’चा उच्चा करून सर्वानुमते संमत करण्यात आले. या वेळी मंदिरांचे प्रतिनिधींनी संघटितपणे मंदिरांच्या व्यापक हिताचे कार्य करणे, मंदिरांवरील सर्व प्रकारचे आघात, अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे, पोर्तुगीजांच्या जाचक राजवटीत आपल्या लढाऊ पूर्वजांनी जतन केलेला मंदिरांचा हा अमूल्य वारसा प्राण पणाला लावून जपणे, मंदिरांचे वाद सामोपचाराने मिटवणार, मंदिरांच्या प्रथा-परंपरा, धार्मिक कृत्ये शास्त्रीय पद्धतीने होतील, यासाठी आग्रही रहाणचा सर्वांनी या वेळी संकल्प केला.