Connect with us

गोवा खबर

राहुल गांधींविरोधात भाजप सरकारी यंत्रणा वापरत आहे: काँग्रेस

Published

on

Spread the love
गोवा खबर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात सत्ताधारी पक्ष सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करून गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आणि पक्षाच्या समर्थकांनी शुक्रवारी पणजीतील आझाद मैदानावर निदर्शने केली.
राहुल गांधी यांच्या ‘मोदी’ आडनावाच्या वक्तव्यावरील खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नाकारल्याने, काँग्रेस नेत्यांनी निदर्शने केली आणि त्यांच्याविरुद्ध कट रचणे म्हणजे ‘लोकशाहीची हत्या’ असल्याचे म्हटले.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले होते आणि त्यामुळे हा निकाल दुर्दैवी आहे.
“नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांबद्दल ते बोलत होते. पण या भ्रष्ट जुमला पक्षाने षड्यंत्र रचून त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवले,” असे ते म्हणाले.
“राहुल गांधी यांनी नेहमीच महागाई, बेरोजगारी आणि भाजपने निर्माण केलेल्या जातीय तणावासारखे अनेक मुद्दे उपस्थित केले. हा निकाल दुर्दैवी आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. देशातील जनता राहुल गांधींसोबत आहे. ज्वलंत मुद्दे मांडणे चुकीचे आहे का, असा प्रश्न अमित पाटकर यांनी केला.
पाटकर म्हणाले की, मोदी सरकार सर्वच बाबींवर अपयशी ठरले असून आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे.
“पंतप्रधानांनी दिलेल्या नोकऱ्यांच्या आश्वासनाचे काय झाले आणि एलपीजीच्या किमती कमी का झाल्या नाहीत. महागाई नियंत्रणात आणण्यात आणि जनतेला दिलासा देण्यात मोदी सरकार अपयशी का ठरले,‘ असे प्रश्न त्यांनी केले आणि  आता जनतेने संघटित होऊन या असंवेदनशील सरकारला धडा शिकवला पाहिजे असे आवाहन केले.
महिला अध्यक्षा बीना नाईक म्हणाल्या की, भाजपने राहुल गांधींच्या विरोधात सरकारी यंत्रणेचा वापर केला आहे. “भाजप त्यांना घाबरत आहे आणि म्हणून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप रकार लोकांमध्ये फूट पाडून राज्य करण्याचे धोरण वापरत आहेत. येथे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे,” असे ती म्हणाली.
काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके म्हणाले की, काँग्रेसने जनतेच्या मदतीने देशासाठी मोठे योगदान दिले आहे. ‘मात्र भाजपने भारतातील लोकशाहीची हत्या केली आहे. देशात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. मणिपूर त्रस्त आहे, मात्र भाजप राजकारण खेळून सरकारे अस्थिर करण्यात व्यस्त आहे,” असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या विरोधात रचलेल्या कटाचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले
विरियटो फर्नांडिस म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेले यश पाहून भाजप हताश झाला आहे. त्यामुळे त्यांना तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. “आपली लोकशाही टिकली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही लढू,” असे ते म्हणाले. दक्षिण गोवा‌ जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा व युवक काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद यांनेही भाषण केले.
यावेळी जनार्दन भंडारी, प्रदिप नाईक, ऑरवील दोरादो, अर्चित  नाईक,एवरसन वालीस, विरेन्द्र  शिरोडकर, सावियो डिसूझा,जयदेव प्रभुगांवकर,विवेक डिसिल्वा,साईश‌आरोसकर,पलेजिया रापोझ, आदी उपस्थित होते.