Connect with us

गोवा खबर

जलस्त्रोत मंत्र्यांची नावेली मतदारसंघाला भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर:जलस्त्रोतमंत्री  सुभाष शिरोडकर यांनी आमदार श्री उल्हास तुयेकर यांच्यासमवेत आज नावीली मतदारसंघातील जलकुंभांना भेट दिली.

त्यांनी लायमती, दवर्ली येथील झर्‍याची पाहणी केली तसेच बागा स्प्रिंग, आकें बायक्सो येथील साळ नदीची उपनदी, घाटमोरड तलाव, साळपे तलाव, डोंगरी, मांडोप बंधारा आणि शनी मंदिर, शनीनगर, मांडोप, नावेलीची पाहणी केली .

नावेलीचे, सरपंच श्री पॉल परेरा, अधीक्षक अभियंता श्री अंकुश गावकर, सहाय्यक अभियंता सागर गावकर, डब्ल्यूआरडीचे अधिकारी व पंच यावेळी उपस्थित होते.

 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व ४० मतदारसंघांचा दौरा करणार असल्याची माहिती श्री.शिरोडकर यांनी दिली. जलसंपदा खाते हे सार्वजनिक संबंधित आणि लोकोपयोगी खाते आहे. लयामती, दवर्ली येथील स्प्रिंगचे सुशोभीकरण करण्यात येणार असून संबंधित अधिकाऱ्याला अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. साळपे तलावाचे सुशोभीकरणही करण्यात येणार असून बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. येत्या पावसाळ्यात पाणी साठून ते शेतीसाठी वापरले जाणार. आज पाहणी झालेल्या सर्व जलकुंभांची कामे तीन ते चार महिन्यांत सुरू होतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पुढे बोलताना त्यांनी डब्ल्यूआरडी संबंधित विभागांद्वारे खात्याने यापूर्वी हाती घेतलेल्या कामांची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले. अधिकारी आठवड्यातून किमान एक दिवस फिल्डवर जातील आणि त्यांच्या भेटीचा संध्याकाळी प्रकल्प अहवाल देतील असे सांगितले. ते म्हणाले की, गोव्याकडे शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. तरुणांना सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सरकारी क्षेत्रात रोजगार मिळू शकतो, परंतु कृषी आणि फलोत्पादनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, आपण कृषी क्षेत्राकडे योग्य लक्ष देण्याची गरज आहे. कृषी आणि शेतीची आवड असलेल्या लोकांना सरकार सर्वतोपरी मदत करते  असेही त्यांनी सांगितले.

 लोकांना सांडपाणी पाण्यात सोडू नये असे आवाहन करून ते म्हणाले की हा गुन्हा असून त्यासाठी शिक्षा केली जाते. जलस्त्रोत खाते विशेषत: सांडपाणी आणि प्रदूषित पाण्यासाठी कालवा बांधण्याचा विचार करीत आहे. ते म्हणाले की लोक नियमितपणे वापरत असलेल्या सर्व जागा स्वच्छ आहेत हे स्थानिक स्वराज्य संस्थांनी पहावे . त्यांनी शेतकऱ्यांना सरकारी योजना व सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्येण्याचे आवाहन केले. सरकारी अतिक्रमित मालमत्ता शोधून नोव्हेंबरपर्यंत कारवाई केली जाईल. सरकारी जमिनीवरील अतिक्रमणावर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

  आगामी काळात डब्ल्यूआरडीशी संबंधित सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतील, असा विश्वास आमदार तुयेकर यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील जनतेच्या अनेक जुन्या मागण्या प्रलंबित असून, जलकुंभ जपण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Continue Reading