Connect with us

गोवा खबर

इफ्फी 2026 च्या मध्यावर प्रदर्शित झालेला ‘आय मॅटर’ हा चित्रपट ओळख, आपलेपणा आणि मानवतेच्या अनेक स्तरांचा शोध घेतो: दिग्दर्शक अलिना सर्बन

Published

on

Spread the love

गोवा खबर:रोमा समुदायामध्ये अशा अनेक कधीही न सांगितलेल्या कथा आहेत ज्या उलगडण्याची वाट पहात आहेत असे रोमानियातील रोमा चित्रपट निर्मात्या आणि ‘आय मॅटर’ (यु कॉन्टेझ) या चित्रपटाच्या दिग्दर्शक अलिना सर्बन यांनी सांगितले. गोव्यात सध्या सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) मध्यावर या चित्रपटाचे सादरीकरण झाले.

इफ्फीच्या अनुषंगाने पत्रसूचना कार्यालयाने (पीआयबी) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सर्बन यांनी या चित्रपटामागची प्रेरणा, चित्रपटात रोमा समुदायाचे केलेले चित्रण आणि चित्रपटाच्या माध्यमातून रूढीवादाला आव्हान देण्याचे महत्त्व याबद्दल चर्चा केली. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री डेनिसा फार्कॅस आणि व्हनेस्सा डान्सिया यांनी देखील या संवादात भाग घेतला.

रोमानियन आणि रोमानी भाषांमधील संवाद असलेल्या ‘आय मॅटर’ या बहुभाषिक चित्रपटाचा भारतातील प्रीमियर आज इफ्फी मध्ये झाला. रोमानिया, जर्मनी आणि बेल्जियम यांची सह-निर्मिती असलेला हा चित्रपट ओळख, कुटुंब, आपलेपणा आणि भूतकाळाच्या पलीकडच्या भविष्याचा शोध घेतो. या चित्रपटात रिबेका या तरुण रोमा स्त्रीची कथा दिसते जी आतापर्यंत तिचे घर असलेले अनाथालय सोडण्याची तयारी करत असते. त्याच सुमाराला तुरुंगातून लवकरच मुक्त होणाऱ्या वडिलांची भेट घेऊन तिच्या इच्छेनुसार स्वतःच्या कुटुंबाची उभारणी करण्याची आशा तिच्या मनात निर्माण होत असतानाच, अभिनय कला शिकण्यासाठी विद्यापीठात तिला मिळालेला प्रवेश नव्या आरंभाची शक्यता निर्माण करतो.

सिनेमाच्या माध्यमातून रूढ कल्पनांना आव्हान देण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, हा चित्रपट मानवी अस्तित्वाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न करतो. “मानव म्हणून जगण्याचा हक्क नेमका कोणाला आहे, असे प्रश्न हा चित्रपट विचारतो. मला माणूसपणाचे वेगवेगळे स्तर मांडायचे आहेत,” असे त्या म्हणाल्या. ‘इफ्फी’ चा भाग होता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि भारतभेटीचे वर्णन ‘घरवापसी’ असे केले.

रोमा समाजाचे पडद्यावर प्रतिनिधित्व करताना येणाऱ्या आव्हानांवर शेरबन यांनी प्रकाश टाकला. जागतिक संस्कृतीवर मोठा प्रभाव असूनही हा समाज आजही मुख्य प्रवाहापासून दूर, वेशीवरच राहिला आहे, असे त्यांनी सांगितले. “फ्लॅमेंकोसारख्या आमच्या संस्कृतीने जागतिक संस्कृतीला आकार दिला आहे. मात्र आम्ही अजूनही समाजाच्या कडेलाच आहोत. आम्ही इतरांच्या इतक्या जवळ राहतो, तरीही त्यांना आमच्याबद्दल काहीच माहिती नाही,” असे त्या म्हणाल्या.

चित्रपटातील सक्षमीकरणाच्या संदेशावर भर देत शेरबन म्हणाल्या की, त्यांना प्रामुख्याने वंचित घटकांतील तरुणांपर्यंत पोहोचायचे आहे. “मला अशी कथा सांगायची होती, जी सर्वप्रथम वंचित गटांतील तरुणांना बळ देईल. मला स्वतःला जे ऐकण्याची गरज होती, तेच त्यांना सांगायचे होते—की मी निभावून नेईन, आणि या जगात आपल्या प्रत्येकासाठी कदाचित एखादी छोटीशी का होईना, पण जागा नक्की आहे,” असे त्या म्हणाल्या.

रेबेकाची भूमिका साकारणाऱ्या प्रमुख अभिनेत्री डेनिसा फारकास यांनी या चित्रपटाचा अनुभव अत्यंत वैयक्तिक असल्याचे सांगितले; या अनुभवाने स्वतःच्या ओळखीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलून टाकला. आपल्या रोमा वंशाचा उल्लेख करण्यास सुरुवातीला वाटणारा संकोच आठवून त्या म्हणाल्या, “पहिल्यांदाच मी रोमा लोकांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले.” ही भूमिका साकारल्यामुळे आपल्या ओळखीशी जोडलेली लाज मागे सारून मुळांशी अभिमानाने जोडले जाण्यास मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले. “मला रोमा असल्याचा अभिमान आहे,” असे म्हणत या समाजाच्या आणि येथील मुलांच्या गोष्टी अखेर ऐकल्या जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या सत्राचे सूत्रसंचालन प्रांजल राय यांनी केले.

Continue Reading