Connect with us

गोवा खबर

‘एलिफंट्स इन द फॉग’ हा चित्रपट सामाजिक स्वीकृती आणि बहिष्काराच्या विरोधाभासाचा शोध घेतो: दिग्दर्शक अबिनाश बिक्रम शाह

Published

on

Spread the love

गोवा खबर:शुभ प्रसंगी समाज तृतीयपंथी स्त्रीचे स्वागत करतो मात्र दैनंदिन जगण्यातील विविध ठिकाणी त्यांना प्रतिष्ठा आणि स्वीकृती देत नाही या मध्यवर्ती विरोधाभासाचा ‘एलिफंट्स इन द फॉग’ या नेपाळी चित्रपटात शोध घेण्यात आला आहे. गोव्यात सध्या सुरु असलेल्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक आणि पटकथा लेखक अबिनाश बिक्रम शाह तसेच मुख्य अभिनेत्री पुष्पा थिंग लामा यांनी हा चित्रपट आणि त्यातील संकल्पना यांचा उहापोह केला.

या चित्रपटाला 79व्या कान्स चित्रपट महोत्सवात उन सर्टन रीगार्ड विभागात परीक्षकांचे विशेष पारितोषिक तसेच सर्वोत्कृष्ट ध्वनी निर्मिती चे पारितोषिक देण्यात आले होते. आता या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेपाळी चित्रपट सृष्टीसाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.

नेपाळमध्ये घडणारा ‘एलिफंट्स इन द फॉग’ हा चित्रपट पिराती या तीन मुलींची आई असलेल्या आणि तिचे ज्याच्यावर प्रेम आहे अशा पुरुषासोबत नवे आयुष्य सुरु करण्याचे स्वप्न बघणाऱ्या तृतीयपंथी स्त्रीची कथा सांगतो. जेव्हा गावाचे रानटी हत्तींपासून संरक्षण करण्यासाठी सुरु असलेल्या रात्रीच्या गस्तीदरम्यान तिची सर्वात धाकटी मुलगी अप्सरा हरवते तेव्हा तिच्या या आकांक्षांना सुरुंग लागतो. मुलीचा शोध घेत असताना हा चित्रपट मातृत्व, ओळख, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक बहिष्कार यांच्या परस्पर छेदांचे अवलोकन करतो.

कान्स महोत्सवापर्यंत चित्रपटाने केलेल्या प्रवासाची माहिती सांगत शाह यांनी आंतरराष्ट्रीय मान्यतेला ‘स्वप्नवत’ संबोधत नेपाळी चित्रपटांना जागतिक व्यासपीठावर प्रतिनिधित्व मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. अनेकदा दुर्लक्षित राहणारे आवाज आणि अनुभव प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट ध्वनी निर्मिती पुरस्कार’  मिळणे विशेष महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपटाच्या शीर्षकाबाबत खुलासा करताना शाह म्हणाले की, हत्ती हा मूळ पटकथेचा भाग नव्हता. मात्र, कथानक पुढे जात असताना तो चित्रपटाच्या मुख्य विषयाचे प्रतीक बनला. हत्तींचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, ठरवून दिलेल्या मर्यादेत राहिल्यास त्यांचा आदर केला जातो; मात्र त्या मर्यादा ओलांडल्यास त्यांची भीती वाटते. शुभप्रसंगी तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्तींना सन्मानाने आमंत्रित केले जाते; मात्र दैनंदिन जीवनात त्यांना समान वागणूक दिली जात नाही किंवा समाजात समान स्थान मिळत नाही. समाज उपेक्षित समुदायांचा स्वीकारही केवळ ठराविक परिस्थितीतच करतो, या वास्तवावर चित्रपट प्रकाश टाकतो.

पुष्पा थिंग लामा यांच्यासाठी पिरातीची भूमिका साकारणे हा आव्हानात्मक आणि वैयक्तिक अनुभव होता. स्वतः एक तृतीयपंथी महिला असल्याच्या अनुभवातून बोलताना, तृतीयपंथी व्यक्तींना आजही समाजात समान स्थान आणि मान्यता मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचे अनुभव अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या कथा लोकांना पाहता, ऐकता आणि समजून घेता येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भूमिकेच्या तयारीबद्दल बोलताना लामा म्हणाल्या की, त्यासाठी त्यांना स्वतःच्या आयुष्यातील अनुभव आणि भावनांचा आधार घ्यावा लागला. तसेच, पात्राचा प्रवास समजून घेण्यासाठी त्याच्या भावविश्वात शिरावे लागले. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि समाजातील आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ या गोष्टी घडवण्यात त्यांच्या आईच्या संगोपनाचा आणि शिकवणीचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.

हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी जवळपास तीन वर्षे लागल्याचे निर्मात्याने सांगितले. पिरातीचा जीवनप्रवास आणि हत्तींचे प्रतीक यांमधून ‘एलिफंट्स इन द फॉग’ हा चित्रपट व्यक्तीची ओळख आणि समाजातील स्थान यांबाबतच्या मर्यादांचा वेध घेतो. शुभप्रसंगी प्रतीकात्मक स्वरूपात सन्मान देणे आणि प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात मात्र सन्मानाची वागणूक न देणे, यांतील तफावतही हा चित्रपट अधोरेखित करतो.

या पत्रकार संवादाचे सूत्रसंचालन लेक्ष्मी प्रिया यांनी केले.

संपूर्ण पत्रकार परिषद येथे पाहा :

Continue Reading