Connect with us

गोवा खबर

त्रिपुरारी पौर्णिमा २०२६ : राज्यस्तरीय नौकायन स्पर्धेच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ

Published

on

Spread the love

गोवा खबर:विठ्ठलापूर, साखळी येथे 24 नोव्हेंबर रोजी राज्य स्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आयोजन समितीची बैठक कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री श्री रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

आमदार श्री. प्रेमेंद्र शेट, कारापूर सर्वण पंचायतीचे सरपंच श्री. योगेश पेडणेकर, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक श्री. विवेक नाईक व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

सुरवातीला कला आणि संस्कृती खात्याचे संचालक श्री. विवेक नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

वाळवंटीच्या पात्रात होणाऱ्या नौकायन स्पर्धेमुळे गोव्यासह शेजारील राज्यांमध्‍ये हा उत्सव प्रसिद्धीस पावलेला आहे. हजारो भाविकांच्‍या उपस्‍थितीत होणाऱ्या या उत्‍सवाचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण म्हणजे नौकानयन स्पर्धा. यंदा अधिकाधिक नौका सहभागी करून घेण्याचे बैठकीत ठरले.

पर्यटन, कला आणि संस्कृती, माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि विठ्ठलापूर दीपावली उत्सव समिती आणि यांच्या संयुक्त विद्यमाने हा राज्यस्तरीय उत्सव साजरा केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण म्हणजे नौकाविहार स्पर्धा. या स्पर्धेत आकर्षक आणि पर्यावरणपूरक नौका सहभागी होत असतात. थरमाकोल पासून बनवलेल्या नौकांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.

गोव्यातील युवा कलाकार आणि पारंपरिक नौकानिर्मितीच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने यंदा बक्षीस रक्कम, मानधन आणि सहभाग भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मयेचे आमदार यांनी या संदर्भातील प्रस्ताव मांडताना गोव्यातील युवा कलाकार आणि हौशी नौकानिर्मितीकार अत्यंत मेहनतीने, कल्पकतेने आणि बारकाईने आकर्षक नौकांची निर्मिती करतात, असे नमूद केले. या कलाकारांच्या सर्जनशीलतेला आणि कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून अधिक आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्पर्धेचा दर्जा उंचावण्यासोबतच अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सहभागाला चालना देण्याच्या दृष्टीने बक्षीस रक्कम आणि इतर आर्थिक घटकांमध्ये वाढ करण्याची मागणी त्यांनी केली होती.

या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून विद्यमान बक्षीस रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम पारितोषिक ३५ हजार रुपयांवरून ६० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक २५ हजार रुपयांवरून ४० हजार रुपये करण्यात आले आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या पारितोषिकांमध्येही अनुक्रमे २० हजारांवरून ३५ हजार रुपये आणि १५ हजारांवरून ३० हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.

याशिवाय, पाच उत्तेजनार्थ पारितोषिकांची रक्कम प्रत्येकी १५ हजारांवरून २५ हजार रुपये करण्यात आली आहे. निवडण्यात येणाऱ्या १० नौकांना दिले जाणारे मानधन प्रत्येकी ८ हजारांवरून १५ हजार रुपये करण्यात आले असून, उर्वरित पात्र सहभागी नौकांसाठीचा सहभाग भत्ता प्रत्येकी ५ हजारांवरून १० हजार रुपये करण्यात आला आहे. न्यायमंडळाच्या मान्यतेनुसार सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात येतील. मात्र, अपात्र ठरविण्यात आलेल्या नौकांना सहभाग भत्ता देण्यात येणार नाही.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाशी निगडित नौकानिर्मिती कला ही गोव्याच्या सांस्कृतिक आणि कलात्मक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या निर्णयामुळे स्थानिक कलाकारांच्या मेहनतीला आर्थिक प्रोत्साहन मिळण्याबरोबरच नव्या पिढीला या पारंपरिक कलेत सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळेल. तसेच स्पर्धेची गुणवत्ता, कलात्मकता आणि भव्यता वाढण्यास मदत होणार असून, गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे त्रिपुरारी पौर्णिमेच्या राज्यस्तरीय उत्सवातील नौकानिर्मिती स्पर्धेला नवी उंची प्राप्त होईल.