Connect with us

गोवा खबर

भाजपने गोव्याला अपयशाच्या खाईत लोटले आहे:वाल्मिकी नाईक

Published

on

Spread the love

दामू नाईक आणि प्रमोद सावंत यांनी आपला गाशा गुंडाळावा, गोमंतकीय त्यांना सत्तेतून हटवण्यासाठी सज्ज – वाल्मिकी नाईक

भाजपच्या योजना समाजातील प्रत्येक घटकासाठी अपयशी ठरल्या असून, महिलांना सर्वाधिक फटका – मॅन्युएल कार्दोझो

म्हादईचा प्रश्न सोडवण्यास नकार देऊन भाजपने गोव्यात पाणीटंचाई निर्माण केली – सुनील सिंगणापूरकर

आपवर टीका करण्यापूर्वी दामू नाईक यांनी फोंडा पोटनिवडणुकीत आयडी रुग्णालयाचा दर्जा वाढवण्याच्या मुख्यमंत्री सावंत यांच्या आश्वासनाचे काय झाले, हे विचारावे – गीतेश नाईक

गोवा खबर :आम आदमी पार्टीचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी आज भाजप सरकारवर जोरदार टीका करत, भाजपने गोव्याला अपयशाशिवाय काहीही दिलेले नाही, असे म्हटले. दामू नाईक आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आता आपला गाशा गुंडाळावा, कारण गोमंतकीय त्यांना सत्तेतून हटवण्यासाठी सज्ज होत आहेत, असा घणाघात त्यांनी केला.

आपच्या ठोस आणि सिद्ध कामगिरीमुळे संपूर्ण भाजप अस्वस्थ झाला आहे, असे आपच्या नेत्यांनी सांगितले. भाजपच्या विविध योजना अपयशी ठरल्याने सामान्य गोमंतकीयांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी वाल्मिकी नाईक यांच्यासोबत आपचे उपाध्यक्ष मॅन्युएल कार्दोझो, सुनील सिंगणापूरकर आणि फोंडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गीतेश नाईक उपस्थित होते.

वाल्मिकी नाईक म्हणाले की, गोव्यासाठी आपच्या हमींवर दामू नाईक यांनी केलेली टीका ही भाजपला आपच्या सिद्ध कामगिरीची भीती वाटत असल्याचेच द्योतक आहे. संपूर्ण गोव्यात भाजपच्या अपयशी योजनांचा मागोवा घेतला, तर जनतेच्या पदरी निराशाच पडल्याचे दिसून येते. गेल्या १५ वर्षांत गृह आधार योजनेच्या लाभात केवळ ३०० रुपयांची वाढ झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नाईक यांनी पुढे सांगितले की, दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजनेतील (DDSSY) नोंदणीकृत कुटुंबांची संख्या २.९ लाखांवरून घसरून १.३८ लाखांवर आली आहे. यावरून या योजनेचे अपयश स्पष्ट होते. एका बूथ बैठकीदरम्यान एका स्थानिक महिलेने सांगितले की, तिला पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी २.५ लाख रुपये खर्च करावे लागले, मात्र DDSSY योजनेतून तिला केवळ २५ हजार रुपये मिळाले. अशा अपयशी आरोग्य योजनेमुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे.

याउलट, पंजाबमधील आप सरकार प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध करून देत आहे. गोव्यातील आपचे आमदारही आपापल्या मतदारसंघांमध्ये नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध करून देत असल्याचे वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.

आपचे उपाध्यक्ष सुनील सिंगणापूरकर यांनी दामू नाईक यांना टीसीपी कायद्याचे कलम ३९-अ रद्द करण्याच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले की, म्हादईचा प्रश्न सोडवण्यास भाजपने नकार दिल्यामुळे गोव्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कर्नाटकात जागा जिंकण्याच्या राजकीय स्वार्थाला प्राधान्य दिले जात असल्याने भाजप म्हादई नदीचा प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

आपचे उपाध्यक्ष मॅन्युएल कार्दोझो यांनी उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीवरून भाजपला धारेवर धरले. या योजनेची अंमलबजावणी अनेक आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. अर्ज मिळवण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागले, तर अनेक सरकारी यंत्रणांकडे अर्जांचे नमुनेच उपलब्ध नव्हते. नगरपालिका आणि पंचायत अधिकाऱ्यांकडे त्यांच्या क्षेत्रातील लोकसंख्येची संपूर्ण माहिती असताना त्यांना पुरेशा प्रमाणात अर्ज का उपलब्ध करून देण्यात आले नाहीत, असा सवाल कार्डोझो यांनी उपस्थित केला.

आपचे फोंडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गीतेश नाईक म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये मोफत वीज उपलब्ध करून दिली आहे; मात्र भाजपने गोव्याच्या जनतेला वाढीव वीजबिलांशिवाय काहीही दिलेले नाही. पोंडा पोटनिवडणुकीला अनेक महिने उलटून गेले, तरी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आयडी रुग्णालयाचे जिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

आपच्या नेत्यांनी शेवटी सांगितले की, भाजपने गोव्याला भ्रष्टाचाराशिवाय काहीही दिलेले नाही. दामू नाईक यांच्या वक्तव्यांमधूनही भाजप गोमंतकीयांसाठी काम करण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट होत आहे.