Connect with us

गोवा खबर

“प्रधानमंत्री सिल्व्हर कप” स्पर्धेत नितीन बगाटे भारतातील “प्रथम पाच” पोलीस अधिकाऱ्यांमध्ये

Published

on

Spread the love

गोवा खबर:रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक  नितीन बगाटे (भा.पो.से.) यांची “प्रधानमंत्री सिल्व्हर कप” स्पर्धेत भारतातील “प्रथम पाच” पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून साकारलेल्या RAIDS अॅपचे सादरीकरण सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA), हैदराबाद येथे करण्यात आले.

RAIDS अॅपच्या माध्यमातून अज्ञात व बेवारस मृतदेहांची माहिती एकत्रित स्वरुपात संकलित करण्यात येते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्रे व इतर माहितीच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार करण्यात येते. मृतदेहाची अवस्था खराब झाल्यामुळे चेहरा ओळखणे कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा पुनर्निर्मित करून ओळख पटविण्यास मदत केली जाते. तसेच बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची 108 विविध रूपे तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात येत आहे.

RAIDS अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत 153 बेवारस मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 135 बेवारस व कुजलेल्या मृतदेहांच्या चेहयांच्या डिजिटल प्रतिकृती AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आल्या असून, त्यापैकी 14 प्रकरणांमध्ये मृतदेहांची यशस्वी ओळख पटविण्यात आली आहे.

तसेच जिल्ह्याबाहेरील 19 बेवारस मृतदेहांपैकी 7 प्रकरणांमध्ये RAIDS अॅपच्या सहाय्याने ओळख पटविण्यात यश आले आहे. याशिवाय अॅपमध्ये एकूण 381 बेपत्ता व्यक्तींची नोंद करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ।। बेपत्ता व्यक्तींच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करून त्यांचा शोध घेण्यात यश आले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे तसेच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या RAIDS ॲपची “प्रधानमंत्री सिल्व्हर कप” स्पर्धेत भारतातील “प्रथम पाच” पोलीस अधिकाऱ्यांमध्ये झालेली निवड ही रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञानाधिष्ठित कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली उल्लेखनीय दखल आहे.