Connect with us

गोवा खबर

गोव्यात 10 ऑक्टोबरला ‘नॅशनल पॅलिएटिव्ह केअर कन्व्हेन्शन 2.0’

Published

on

Spread the love

गोवा खबर : नॅशनल असोसिएशन ऑफ पॅलिएटिव्ह केअर फॉर आयुष अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन (NAPCAIM) च्या गोवा चॅप्टरतर्फे ‘नॅशनल पॅलिएटिव्ह केअर कन्व्हेन्शन 2.0’ चे आयोजन शनिवार, 10 ऑक्टोबर 2026 रोजी सेंट इनेज-पणजी येथील काकुलो मॉलमधील टर्मिनल बँक्वेट येथे करण्यात येणार आहे. NAPCAIMच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत आणि माजी अध्यक्ष डॉ. वल्लभ धायमोडकर यांनी याबाबत माहिती दिली.

‘वर्ल्ड हॉस्पिस अँड पॅलिएटिव्ह केअर डे 2026’ निमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘Pain Management – An Essential Part of Palliative Care’ ही परिषदेची संकल्पना असून, गंभीर आणि जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या वेदनांचे सर्वांगीण व्यवस्थापन तसेच त्यांच्या सामाजिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देण्यावर परिषदेत भर दिला जाणार आहे.

डॉ. भागवत आणि डॉ. धायमोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील रोमिला पॅलिएटिव्ह केअरच्या संस्थापक पद्मश्री डॉ. आर्मिडा फर्नांडिस आणि NAPCAIMचे सहाय्यक उपाध्यक्ष तथा AYUSH, IIIPCचे संचालक डॉ. के. एल. बाबू हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

परिषदेच्या वैज्ञानिक सत्रात पद्मश्री डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांचे ‘An Overview of Pain Management in Palliative Care’ या विषयावर प्रमुख व्याख्यान होणार आहे. तसेच कर्करोग उपचारांमध्ये ओपिऑइड्स आणि वेदनाशामक औषधांची भूमिका, पॅलिएटिव्ह केअरमधील होमिओपॅथिक औषधांची परिणामकारकता, आयुर्वेदातील वेदना व्यवस्थापन तसेच ओपिऑइड्स आणि वेदनाशामक औषधांसंदर्भातील कायदेशीर अनुपालन अशा विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत.

‘Integration of Pain Management with Multi-disciplinary Approach’ या विषयावर परिसंवादही आयोजित केला जाणार आहे. विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञ यात सहभागी होतील. पॅलिएटिव्ह केअरमध्ये वेदना व्यवस्थापनाच्या एकत्रीकरणावर टेबल-टॉप एक्सरसाइज आणि खुली चर्चाही होणार आहे.

हॉस्पिस आणि पॅलिएटिव्ह केअरबाबत व्यापक जनजागृती करणे तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. वैज्ञानिक कार्यक्रमासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या परिषदेत गोवा तसेच इतर राज्यांमधून 300 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. विविध वैद्यकीय शाखांतील डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिक्स, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत.

या परिषदेला गोवा सरकारसह सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील संस्था, स्वयंसेवी संस्था आणि हितचिंतकांचे सहकार्य लाभणार आहे. पॅलिएटिव्ह केअर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा उद्घाटन सोहळ्यात सन्मानही केला जाणार आहे.

परिषदेच्या संकल्पनेवर आधारित पोस्टर प्रेझेंटेशन आयोजित करण्यात येणार असून, सॉफ्ट कॉपी सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2026 आहे. तर अर्ली-बर्ड नोंदणी 10 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.

परिषदेचे आयोजन डॉ. स्नेहा भागवत – आयोजन अध्यक्ष, वंदना काकोडकर – आयोजन सचिव, सुविदा कांतक – आयोजन खजिनदार आणि डॉ. वल्लभ धायमोडकर – सल्लागार यांच्या नेतृत्वाखाली NAPCAIM गोवा चॅप्टरच्या विविध समित्यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे.