Connect with us

गोवा खबर

अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवणारा भारत हा एकमेव देश : दिगंबर कामत

Published

on

Spread the love

दक्षिण जिल्हा मुख्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

गोवा खबर:सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री दिगंबर कामत यांनी आज मडगाव येथील माथानी साल्ढाना प्रशासकीय संकुलात ८० वा स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वज फडकविला.

 भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहून श्री कामत यांनी आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की भारत हा एकमेव देश आहे ज्याने अहिंसक मार्गाने आपले स्वातंत्र्य मिळविले आहे असे सांगितले. अनेक संकटांना तोंड देऊनही आज आपला देश आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेने ताठ उभा आहे, याचे एकमेव कारण म्हणजे प्राचीन संस्कृती आहे, असे ते पुढे म्हणाले. जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा जगातील अनेक राष्ट्रांनी म्हटले होते की भारत कधीही एकसंध राहू शकणार नाही, परंतु प्राचीन कलेत रुजलेल्या भारताच्या संस्कृतीने देशाला एकसंध ठेवले आहे आणि आजही आपला भारत जगातील प्रथम क्रमांकाचे राष्ट्र बनण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारत सर्वांगिण विकासाच्या मार्गावर आहे. भारताने विविध क्षेत्रांमध्ये मिळविलेली प्रतिष्ठा आणि या क्षेत्रातील विकासाचा प्रवास इतर देश आश्चर्याने पाहत आहेत. भारत पुढे जात आहे याचे संपूर्ण जगाला आश्चर्य वाटते असे श्री कामत म्हणाले.

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेल्या विकासावर भर देताना श्री कामत यांनी पूर्वी देशात ७४ विमानतळे होती, जी आता प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या ‘उड्डान’ योजनेअंतर्गत १६० वर पोहोचली आहेत असे सांगितले.

पुढे बोलताना श्री कामत यांनी प्रधान मंत्र्यानी आपल्या नेतृत्वाने जगात आपली छाप सोडली आहे. सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांच्या गरजा ओळखून, त्यांनी विविध योजना, सवलती आणि सुविधा सुरू केल्या आहेत आणि आज कोट्यवधी भारतीय त्याचा लाभ घेत आहेत असे सांगितले. वंदे भारत ट्रेन, जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब पूल, बुलेट ट्रेन हे सरकारच्या काही प्रमुख उपक्रमांपैकी आहेत असे ते म्हणाले. केवळ रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधा बांधून राष्ट्राचा विकास साधला जात नाही – खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा सरकार सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाला प्राधान्य देते असेही ते म्हणाले. प्रधान मंत्र्यांनी सर्वसामान्य माणसाला आपल्या दूरदृष्टीच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. आरोग्य आणि शिक्षण ही दोन क्षेत्रे सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला स्पर्श करतात आणि सरकार याच दृष्टिकोनासाठी कटिबद्ध आहे. आयुष्मान कार्ड, २३ एम्स रुग्णालये, २३ आयआयटी, २१ आयआयएम आणि ३१ एनआयटी यांचा लाभ देशातील विद्यार्थी आणि नागरिकांना होतो. आयुष्मान भारत ही आरोग्य-संबंधित योजना जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना बनली आहे. त्याचप्रमाणे, स्किल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, मुद्रा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या विविध योजना जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक कल्याणकारी योजना बनल्या आहेत असेही ते म्हणाले.

देशाच्या प्रधान मंत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याच्या आणि राज्यातील लोकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून उत्कृष्ट कार्य करीत आहेत असे ते म्हणाले. स्वयंपूर्ण गोवा चळवळ हाही एक महत्त्वाचा कार्यक्रम बनला आहे. भारताला एक विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी देशातील प्रत्येक राज्याचा विकास होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.  भारताला ‘विकसीत भारत २०४७’ मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रधान मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०३७ पर्यंत ‘विकसीत आणि स्वयंपूर्ण गोवा साध्य करण्याचे ध्येय ठेवले आहे. मुख्यमंत्री रोजगार योजना, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना, अटल आसरा योजना, मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा, म्हजे घर योजना आणि इतर विविध योजना हे ध्येय साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावितात.

गोव्यात ६०६२ किलोमीटरचे रस्त्याचे जाळे आहे. या जाळ्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने अंदाजे १६,००,०००/- कोटी रुपयांचे आर्थिक अनुदान दिले आहे, ज्याद्वारे वेस्टर्न बायपास, अटल सेतू, पर्वरी कॉरिडॉर विकसित करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी १० सप्टेंबर २०२६ रोजी पर्वरी कॉरिडॉरचे उद्घाटन करतील अशी माहिती त्यांनी दिली.

गोवा एक शैक्षणिक केंद्र बनत आहे हा संदेश संपूर्ण देशाला गेला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी लोकांना शैक्षणिक प्रकल्पांना विरोध न करण्याचे आवाहन केले. त्यांनी लोकांना कोणत्याही विकास प्रकल्पाला केवळ विरोध करण्यासाठी विरोध करू नका असे सांगितले. जर कोणत्याही प्रकल्पामुळे खरोखरच काही अडचण येत असेल तर आपण एकत्र बसून चर्चा करूया आणि तो प्रश्न सोडवूया. कोणत्याही प्रकल्पाला केवळ विरोध करण्याची प्रवृत्ती ही राज्याचे नुकसान आहे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी श्री कामत यांचे आगमन झाल्यावर एग्ना क्लीटस, आयएएस आणि दक्षिण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, श्री टिकम सिंग वर्मा, आयपीएस यांनी त्यांचे केले.

श्री कामत यांनी मानवंदना स्वीकारली आणि पोलीस व होमगार्ड संचलनाची पाहणीही केली. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांच्या बँडने राष्ट्रगीत वाजविले.

या प्रसंगी आमदार श्री उल्हास तुयेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ श्री रमेश गावकर आणि दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाचे इतर वरिष्ठ अधिकारी व इतर यावेळी उपस्थित होते.

वेर्णा येथील फादर अग्नेल उच्च माध्यमिक शाळा, वेर्णा येथील महालसा नारायणी उच्च माध्यमिक शाळा आणि राय येथील गांवकर उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. नुवे येथील कार्मेल उच्च माध्यमिक शाळेने राष्ट्रगीत सादर केले.