गोवा खबर: राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) शासकीय योजना आणि सेवांचा लाभ अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘युनिफाइड डिजिटल पोर्टल (UDP)’ चे लोकार्पण करण्यात आले. डोना पावला येथील लोकभवनमध्ये आयोजित जागतिक एमएसएमई दिन २०२६ कार्यक्रमात हा महत्त्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला.
कार्यक्रमाला उद्योगमंत्री माविन गोडिन्हो, वरिष्ठ अधिकारी, विविध भागधारक आणि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते https://msme.goa.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या युनिफाइड डिजिटल पोर्टल (UDP) चे उद्घाटन करण्यात आले. हे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ राज्यातील एमएसएमई उद्योगांना विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
यावेळी RAMP योजनेअंतर्गत गोव्यातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘इन्व्हेस्ट गोवा’ कॉफी टेबल बुक चेही प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात पीएमईजीपी (PMEGP) अंतर्गत ११४ हून अधिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, कौशल्य विकास, आयटीआयचे आधुनिकीकरण आणि उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील सहकार्यावर सरकार सातत्याने भर देत आहे. त्यामुळे गोवा एमएसएमई, नवोपक्रम आणि उत्पादन क्षेत्रातील सक्षम केंद्र म्हणून पुढे येत आहे.
एमएसएमई हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून ‘विकसित भारत’ घडविण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उद्यम पोर्टल, पीएम विश्वकर्मा, पीएमईजीपी २.०, वन नेशन वन टॅक्स आणि जनविश्वास सुधारणा यांसारख्या उपक्रमांमुळे देशात व्यवसाय सुलभता वाढली असून उद्योजकांना मोठे बळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.