गोवा खबर: रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत केंद्र सरकारने १६ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरण तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यातील कलम 26A अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, याबाबत राज्याच्या अन्न व औषध प्रशासन संचालनालयाने संबंधितांना सूचना जारी केल्या आहेत.
औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या शिफारशीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित औषधांना पुरेसा उपचारात्मक आधार नसल्याचे तसेच त्यांचा वापर मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे निरीक्षण नोंदविण्यात आल्याने केंद्राने त्यांच्यावर बंदी लागू केली आहे.
संचालनालयाने डॉक्टरांना या प्रतिबंधित औषधांची रुग्णांना शिफारस किंवा प्रिस्क्रिप्शन देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच औषध विक्रेते, वितरक आणि घाऊक विक्रेत्यांनी आपल्या साठ्यातील संबंधित औषधे तातडीने बाजूला काढून त्यांचे वितरण व विक्री थांबवावी, असे सांगण्यात आले आहे.
याशिवाय, औषध दुकाने आणि वितरकांनी उपलब्ध असलेला प्रतिबंधित साठा संबंधित पुरवठादारांकडे परत पाठवून त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन संचालनालयाला सादर करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, संबंधित सर्वांनी शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.