गोवा खबर : कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी गोव्यात वाढत्या अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) व्यवसायावर चिंता व्यक्त केली आहे. अमली पदार्थांचा पुरवठा मार्ग शोधून काढणे आणि त्यामागील मुख्य सूत्रधारांना अटक करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांना गुन्हेगारी व बेकायदेशीर कृत्यांविरोधात अधिक आक्रमकपणे पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
यासाठी सक्षम आणि मजबूत गुप्तचर यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दारू पिऊन आणि ड्रग्जच्या नशेत वाहने चालवणाऱ्या पर्यटकांमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा व्यक्तींना किमान ४८ तास कारागृहात ठेवण्याची तरतूद कायद्यात करावी, अशी विनंती ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. तसेच, रेंट-अ-कार पर्यटकांकडून होणाऱ्या गैरवापरावर आणि अपघातांवर रोख लावण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.