गोवा खबर : गोवा आता केवळ निसर्गरम्य किनाऱ्यांसाठीच नाही, तर जागतिक पातळीवर ‘वेलनेस टूरिझम’चे मुख्य केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. ‘संयोग – आयएसएम योग परिषद २०२६’ या परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
गोवा कौन्सिल ऑफ आयुर्वेदिक अँड अदर अलाईड इंडियन सिस्टीम्स ऑफ मेडिसिन आणि आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ या मुख्य संकल्पनेवर ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आरोग्य खात्याच्या संयुक्त सचिव तृप्ती मणेरकर, आयुष खात्याच्या संचालक डॉ. पूजा मडकईकर, डॉ. स्नेहा भागवत आणि जॉय परेरा यांच्यासह अनेक योगतज्ज्ञ व डॉक्टर उपस्थित होते. राज्याचा लौकिक वाढवण्यासाठी ‘गोवा आयुर्वेद आणि योग वेलनेस धोरण २०२६’ अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक आकर्षित होऊन स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होतील.
राज्यात राबवलेल्या ‘हेल्थ विथ आयुर्वेद – चेक्ड बाय दोतोर’ या मोहिमेला मिळालेल्या प्रचंड यशानंतर सरकारने आयुष सेवा अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत मोलाचे योगदान देणारे डॉक्टर, खाजगी क्लिनिक्स आणि रुग्णालयांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले, आयुर्वेद हा आरोग्याचा मुख्य कणा ठरणार असून पारंपारिक वैद्यकीय उपचार पद्धतींना आधुनिक आरोग्य व्यवस्थेशी जोडून गोमंतकीय जनतेला आणि पर्यटकांना दर्जेदार आरोग्यदायी जीवनशैली देण्याचा सरकारचा निर्धार आहे. ‘फिट गोवा, हेल्दी गोवा, स्ट्रॉंग गोवा आणि हॅप्पी गोवा’ हे आपले स्वप्न असल्याचे सांगत त्यांनी, चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी सरकारने टाटा इस्पितळासह करार केला असून इतर वैद्यकीय संस्थांशीही करार करून न्यूरो रिहॅबसारखी सेवा घेता येईल, असे स्पष्ट केले. ४० वर्षांवरील वयाच्या हजारो लोकांनी या शिबिरांमध्ये भाग घेऊन आरोग्याची तपासणी करून घेतल्याने ही मोहीम अत्यंत यशस्वी ठरल्याचेही त्यांनी सांगितले.