गोवा खबर : मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत, गायक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नटश्रेष्ठ प्रसाद सावकार यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. करंजाळे-पणजी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात कुटुंबीय असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि मराठी नाट्यविश्वात शोककळा पसरली आहे.
१४ डिसेंबर १९२८ रोजी बडोदे (गुजरात) येथे जन्मलेल्या प्रसाद सावकार यांना लहानपणापासूनच संगीत आणि रंगभूमीची आवड होती. वडील टिळक सुर्वे आणि काका गोपीनाथ सावकार यांच्या नाटक कंपन्यांमधून त्यांना अभिनय आणि गायनाचे धडे मिळाले. बालशिवाजीची भूमिका साकारत त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.
सावकार यांनी आपल्या कारकिर्दीत पाच दशकांहून अधिक काळ संगीत, अभिनय आणि नाट्यक्षेत्रात मोलाचे योगदान दिले. ‘संगीत संशयकल्लोळ’ हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे नाटक मानले जाते. याशिवाय त्यांनी अनेक संगीत नाटकांमध्ये विविध भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली.
‘जय गंगे भागीरथी’ आणि ‘सावन घन गरजे’ यांसारखी त्यांनी गायलेली गीते विशेष लोकप्रिय ठरली. २००८ साली सादर झालेले ‘अवघा रंग एकची रंग’ हे त्यांचे अखेरचे नाटक होते.
कला क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. तसेच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देखील प्राप्त झाला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसाद सावकार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “नाट्यसृष्टीतील तेजस्वी तारा हरपला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.