Connect with us

गोवा खबर

आमोणा येथे थरार: मुख्यमंत्री सावंत यांच्या ताफ्याला धडक देण्याचा प्रयत्न, पोलीस कॉन्स्टेबलसह पाच जण ताब्यात

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या ताफ्याला एका वाहनाने थेट धडक देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि गंभीर घटना आमोणा-साखळी जंक्शन येथे गुरुवारी रात्री घडली. या थरारक प्रसंगानंतर सुरक्षा पथक आणि पोलिसांनी तत्परता दाखवत एका पोलीस कॉन्स्टेबलसह पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री असलेले मुख्य वाहन ताफ्यातून पुढे निघून गेल्यानंतर सुरक्षा पथकाला एका कारची संशयास्पद हालचाल लक्षात आली. संबंधित वाहन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दिशेने अतिशय वेगाने येत असल्याचे दिसताच सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत ते वाहन अडवले. या वाहनाने ताफ्याला धडक देण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून गाडीत असलेल्या पाचही जणांना पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले.

या घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व संशयित खांडोळा-बेतकी परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्राथमिक तपासानुसार, वाहनचालक हा मद्याच्या प्रभावाखाली असावा असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संबंधित कार जप्त केली असून, या अत्यंत गंभीर घटनेमागील नेमके कारण, त्यांचा हेतू आणि संशयितांच्या भूमिकेबाबत डिचोली पोलीस अधिक तपास करत आहेत.