गोवा खबर : वास्को येथून कुळ्ये येथील मेटावाडा येथे फिरण्यासाठी आलेल्या पाच मित्रांपैकी चौघांचा दूधसागर नदीतील खोल डोहात बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे वास्को आणि कुळ्ये परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये रामण्णा परशू मदार (वय १९) आणि लक्ष्मण परशू मदार (वय १९) या जुळ्या भावांसह त्यांचा मोठा भाऊ हिराण्णा परशू मदार (वय २१) आणि त्यांचे मित्र विजय साजिली (वय २०, रा. वास्को) यांचा समावेश आहे.
विजय हा सांकावाळ-झुआरीनगर येथील एमईएस कॉलेजमध्ये तृतीय वर्षात शिकत होता, तर मदार बंधूंपैकी जुळे भाऊ बोगदा येथील आयटीआय कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते आणि मोठा भाऊ हॉटेलमध्ये कामाला होता.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्को येथून पाच मित्र शनिवारी सकाळी रेल्वेने कुळ्ये येथे आले आणि त्यानंतर दूधसागर नदीकाठी गेले. त्यापैकी चौघेजण अंघोळीसाठी नदीत उतरले, तर राहुल महादेव हरिजन (२०) हा तरुण किनाऱ्यावरच थांबला होता. ज्या ठिकाणी हे तरुण पाण्यात उतरले, तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने आणि तो डोहाचा भाग असल्याने ते खोल पाण्यात गेले. चौघांनाही पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. किनाऱ्यावर उभा असलेल्या राहुलने हे पाहताच तात्काळ आरडाओरड केली, मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने तातढीने मदत मिळू शकली नाही आणि पाहता पाहता चारही जण पाण्यात बुडाले.
या घटनेनंतर राहुलने तातडीने कुळ्ये पोलीस स्थानक गाठून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रोहन नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गावस, सुधाकर गावकर, हवालदार विराज देसाई व अन्य कर्मचारी स्थानिक जीवरक्षकांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जीवरक्षकांच्या मदतीने काही वेळातच चौघांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले असून ते मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घरातून कॉलेजला जात असल्याचे आणि संध्याकाळपर्यंत परत येतो असे सांगून निघालेल्या या मुलांचे मृतदेहच घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.