गोवा खबर : मगो पक्ष हा खऱ्या अर्थाने गोरगरीब, सामान्य जनता व बहुजन समाजाचा पक्ष आहे, म्हणूनच कदाचित निवडणुका जवळ आल्या की काही लोकांना फक्त मगो पक्षच खुपतो, असा आरोप मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केला आहे.
फोंडा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आगामी विधानसभा निवडणूक ही मगो-भाजप युती अशीच होणार असून वेळ येताच जागा वाटपाबाबत सुद्धा सकारात्मक चर्चा होईल. मगो पक्ष राज्यातील १२ ते १४ विधानसभा मतदारसंघांत पूर्णपणे सक्षम आहे. आगामी निवडणुकीत युतीची बोलणी करत असताना नेमक्या किती जागा लढवायच्या याचा विचार त्यानुसारच केला जाईल आणि युतीचा धर्म आम्ही निश्चितपणे पाळू, असे त्यांनी सांगितले. राजकारणात नेहमीच राजकीय पक्षांवर टीका करणे हे चालूच असते, परंतु ती टीका सकारात्मक असायला हवी. आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी कुणावरही चिखलफेक करणे योग्य नाही, निवडणुकीच्या वेळी काही लोकांना टीका-टिपणी करायला फक्त मगो पक्षच दिसतो, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या ‘भाऊसाहेब बांदोडकर व शशिकला काकोडकर यांच्यानंतर मगोचा मुख्यमंत्री का नाही झाला?’ या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, मगोने बहुजन समाजाला डोळ्यासमोर ठेवूनच राजकारणात काम केले, परंतु नंतर मगोचा मुख्यमंत्री न होण्यास अनेक कारणे आहेत. काँग्रेस-भाजप यांसारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षांनी कालांतराने मगोला फोडण्याचे काम केले, ज्यामुळे पक्षाची आर्थिक स्थिती तेवढी चांगली राहिली नाही. अशा कठीण परिस्थितीतही मगोने मोठ्या पक्षांना टक्कर देऊन आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. आगामी विधानसभा निवडणूक मगो निश्चितपणे लढणार असून फोंडा, प्रियोळ, शिरोडा या मतदारसंघातून लोक स्वतःहून त्यांना प्रतिनिधित्व करण्याची गळ घालत आहेत. प्रियोळ मतदारसंघ एसटी समाजासाठी आरक्षित झाल्यावर सुद्धा आमच्याकडे तिथे सक्षम पर्याय आहे, सध्या तिथे सर्वेक्षण चालू असून सर्वेक्षणाच्या अहवालानुसार कोणत्या पर्यायाची निवड करावी यावर निश्चित सल्लामसलत होईल, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.