Connect with us

गोवा खबर

पैशाच्या बळावर निवडणूक लढवणाऱ्यांना तिकीट नाही

Published

on

Spread the love

प्रदेशाध्यक्ष चोडणकर : प्रामाणिक उमेदवारांनाच मिळणार संधी

गोवा खबर : आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना तिकीट देणार नाही, तर केवळ प्रामाणिक उमेदवारांनाच संधी देईल, असे नवे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे.

चोडणकर यांनी हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थानला भेट देऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सध्या नोकऱ्यांमधील घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे तरुण पिढी आणि सामान्य नागरिक भरडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सद्यस्थितीतील सरकार गोव्याच्या हिताचे रक्षण करण्यात अपयशी ठरले असून भ्रष्टाचारी राजवटीपासून जनतेला मुक्ती मिळावी, यासाठी आपण देव रुद्रेश्वराकडे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत गोव्यात खऱ्या अर्थाने एक लोकाभिमुख सरकार स्थापन व्हावे हीच काँग्रेसची भूमिका आहे.

चोडणकर यांनी घेतलेले देव रुद्रेश्वराचे दर्शन आणि त्यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण देव रुद्रेश्वर हे गोव्यातील बहुसंख्य भंडारी समाजाचे आराध्य दैवत आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याचे यावरून स्पष्ट होते.

गोव्यामध्ये सध्या सुरू असलेल्या विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची पिळवणूक थांबवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. आगामी काळात जे लोक पैशाच्या किंवा सत्तेच्या लालसेपोटी काम करत नाहीत, तर ज्यांच्याकडे जनसेवेची आवड आणि नैतिक मूल्ये आहेत, अशाच निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल. काँग्रेस पक्ष सामान्य माणसाच्या हक्कासाठी आणि पारदर्शक सरकार आणण्यासाठी कटिबद्ध असून यासाठीच आपण रुद्रेश्वराला साकडे घातल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.