मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत घेतली भेट
गोवा खबर : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन राज्यातील सिंचन प्रकल्प, पाणी व्यवस्थापन, जलसुरक्षा आणि म्हादई नदी विवादासह विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. गोव्यातील सिंचन सुविधांना अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली. राज्यातील शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाणी वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय झाला.
बैठकीदरम्यान राज्यातील जलस्रोतांचा कार्यक्षम वापर, पाणी साठवण क्षमता वाढविणे, सिंचन जाळे मजबूत करणे तसेच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी केंद्राच्या मदतीने विविध प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. गोव्याच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक तांत्रिक व आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. याच दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी म्हादई नदी प्रकरणाची सद्यस्थिती आणि राज्याची भूमिका याबाबी देखील केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.