Connect with us

गोवा खबर

आरजीपीचे व्हॉट्सॲप चॅट लीक; आमदार विरेश बोरकर यांच्यासोबत उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक

Published

on

Spread the love

गोवा खबर : रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी (आरजीपी) च्या सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी (सीईसी) ग्रुपमधील कथित व्हॉट्सॲप चॅट लीक झाल्यामुळे पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चॅटमध्ये पक्षाचे माजी प्रमुख मनोज परब आणि इतर काही प्रमुख सदस्यांनी पक्षाचे एकमेव आमदार विरेश बोरकर यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा दावा केला जात आहे.

या प्रकारामुळे पक्षात अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून विरोधी पक्षांकडूनही यावर टीका केली जात आहे. या प्रकरणावर पक्षाचे खजिनदार अजय खोलकर यांनी सांगितले की, हा पक्षांतर्गत विषय असून वरिष्ठ नेत्यांमध्ये यावर चर्चा होईल. व्हायरल चॅटच्या सत्यतेची अद्याप पुष्टी झालेली नसल्याने कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पक्ष लवकरच यावर स्पष्टीकरण देईल.

दरम्यान, आमदार विरेश बोरकर यांनी पक्ष नेतृत्वाला ईमेल पाठवून अधिकृत बैठक बोलावण्याची आणि त्यात स्वतःसह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही सामील करून घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार ३० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता पणजी येथील पक्षाच्या कार्यालयात केंद्रीय समितीची बैठक निश्चित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षांतर्गत वादामुळे मनोज परब यांनी राजीनामा दिला होता, त्यामुळे या बैठकीत पक्षातील मतभेद मिटणार का आणि आरजीपीची पुढील वाटचाल कशी असेल, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.