गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा नुकताच झालेला दोन दिवसांचा दिल्ली दौरा अतिशय यशस्वी ठरला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात गोव्याला येण्याचे निमंत्रण दिले आहे. या काळात पर्वरी येथील उड्डाणपुलासह राज्यातील इतर महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे.
दिल्लीहून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. या महत्त्वपूर्ण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एकूण पाच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि गोव्याच्या दृष्टीने राजकीय व विकासात्मक चर्चा केली.
या भेटीदरम्यान गोव्यातील ध्वनी मर्यादा शिथिल करणे, सीआरझेडचे नियम आणि वाळू उपशाचे रखडलेले परवाने या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. किनाऱ्यांवरील विवाह सोहळ्यांसाठी ध्वनी मर्यादेत शिथिलता आणण्याबाबत पंतप्रधानांनी पर्यावरण मंत्रालयाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच मडगाव येथे लवकरच नवीन ईएसआय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिले असून, ८ जून रोजी केंद्रीय जलमार्गमंंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते बंदर कप्तान खात्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
मंत्रिमंडळातील रिक्त जागेबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी लवकरच नाव निश्चित करून प्रसारमाध्यमांना जाहीर केले जाईल असे सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज, शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता पणजीतील एका हॉटेलमध्ये भाजपच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.