गोवा खबर : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागीय कार्यालयाने हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या रेस्टॉरंटच्या बेकायदेशीर संचालनाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ११.०१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट (PMLA) २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणातील एकूण जप्त रक्कम आता २१.०५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ६ डिसेंबर २०२५ रोजी या रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर तपासात असे समोर आले की, संबंधित रेस्टॉरंट फायर एनओसी आणि इतर आवश्यक परवानग्यांशिवाय चालवले जात होते. तसेच मार्च २०२४ मध्ये व्यावसायिक परवान्याची मुदत संपल्यानंतरही ते सुरू ठेवून कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला होता, जो मनी लाँड्रिंग अंतर्गत बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे.