Connect with us

गोवा खबर

कथा सांगण्यासाठी गोमंतकीय निर्माते मोठा धोका पत्करतात : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : हॉलीवूड, बॉलीवूड किंवा टॉलीवूडमध्ये चित्रपटांचे यश त्यांच्या उलाढालीवर व परताव्यावर मोजले जाते; मात्र गोव्यातील चित्रपट निर्मात्यांकडे अशी सोय नसून, आपल्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते मोठा धोका पत्करतात, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

शुक्रवारी पणजी येथील मॅकनिझ पॅलेस येथे ‘उमेश’ या कोंकणी चित्रपटाच्या प्रीमियर व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हा चित्रपट गुरु अँड असोसिएट्स प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली गुरुनाथ आत्माराम पाताडे यांनी निर्मित केला आहे.

यावेळी मान्यवर म्हणून बीसीसीआयचे माजी संयुक्त सचिव रोहन गांवस देसाई, राजीव कला मंदिर, फोंडा चे अध्यक्ष रितेश नाईक, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी)च्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, निर्माता गुरुनाथ आत्माराम पताडे व दिग्दर्शक वर्धन विजयकुमार कामत उपस्थित होते.

निर्माते, दिग्दर्शक, कलाकार व संपूर्ण टीमला शुभेच्छा देताना सावंत यांनी ‘उमेश’ ही ‘खास गोमंतकीय कथा’ असल्याचे सांगितले. हा चित्रपट जगभर प्रदर्शित होऊन गोमंतकीयांना एकत्र आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील काळात आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

“‘उमेश’ ही खास गोव्याची कथा आहे. बॉलीवूड, हॉलीवूड किंवा टॉलीवूड मध्ये चित्रपटांची उलाढाल आणि परतावा पाहतात. येथे मात्र परतावा मिळण्याची निश्चिती नाही. तरीही धोका पत्करुन निर्माते पैसा गुंतवतात, कारण गोव्याची कथा सांगितली जाणे आवश्यक आहे आणि कोंकणी भाषा अधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी ते प्रयत्न करतात,” असे सावंत म्हणाले.

“कोंकणी चित्रपट बनवताना निर्माते सरकारकडून किती मदत मिळेल याकडेही पाहत नाहीत. ईएसजी कोंकणी व मराठी चित्रपटांना स्पर्धा व उपक्रमांद्वारे पाठबळ देत आहे. गोवा तसेच जगभरातील गोमंतकीय कोंकणी चित्रपटांना पाठिंबा देतील. ‘स्वयंपूर्ण गोयें’चे आणखी एक स्वप्न या चित्रपटातून पूर्ण होत आहे. सरकारकडून आवश्यक ती मदत आम्ही देऊ,” असे त्यांनी नमूद केले.

देसाई यांनी आजच्या डिजिटल युगात रंगभूमीवरील कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचा संगम आवश्यक असल्याचे सांगितले. “चित्रपटात काही कलाकार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत. त्यांची पहिली पसंती रंगभूमी किंवा युट्यूब असली, तरी मोठ्या पडद्यावर येताना त्यांना नवे व्यासपीठ मिळते. समाज माध्यमांमुळे संधी वाढल्या आहेत. कोंकणी ही आपली ‘मायभाषा’ आहे. पोर्तुगीज काळापासून ती टिकून आहे. हा धाडसी प्रयत्न केल्याबद्दल मी टीमचे अभिनंदन करतो,” असे ते म्हणाले.

रितेश नाईक यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, चित्रपटाचे काही भाग पीईएस कॉलेज, फोंडा येथे चित्रीत करण्यात आले. “तरुण कलाकारांना व्यासपीठ मिळाले याचा आनंद आहे. फोंडा कलाकारांची भूमी म्हणून ओळखली जाते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार कोंकणी व मराठी चित्रपटांना पाठिंबा देत आहे,” असे त्यांनी सांगितले.

डिलायला लोबो यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत गोमंतकीयांनी चित्रपट पाहावा, असे आवाहन केले.

दिग्दर्शक वर्धन कामत म्हणाले, “चित्रपट बनवणे सोपे वाटत होते, पण प्रत्यक्षात ते कठीण आहे. ऑक्टोबर २०२४ पासून मेहनत करणाऱ्या माझ्या टीममुळे हा चित्रपट पुर्ण करणे शक्य झाले. ईएसजी, मुख्यमंत्री, देसाई आणि निर्मात्यांचे मी आभार मानतो.”