गोवा खबर : गोव्यातील म्हापसा-खोर्लि येथील एका भाड्याच्या बंगल्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर सायबर क्राईम पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली. या छाप्यात अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ७ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशी केली कारवाई
सायबर क्राईमचे पोलीस अधीक्षक (SP) राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली २७ मार्च रोजी रात्री ११:३० ते २८ मार्च पहाटे ४ वाजेपर्यंत ही शोधमोहीम राबवण्यात आली. म्हापसा येथील एका बंगल्यात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
अटकेतील संशयिता मध्ये
१) लक्ष्मणेंद्र कौशिक (ठाणे, महाराष्ट्र)
२) सौरभ विकास घोडके (रायगड, महाराष्ट्र)
३) प्रवेश नामदेव सावंत (कांदिवली पूर्व, मुंबई)
४) निसर्ग चेतनकुमार ठक्कर (अहमदाबाद, गुजरात)
५) राजस रमेश भगत (कांदिवली पूर्व, मुंबई)
६) अविनाश प्रदीप वर्मा (शामली, उत्तर प्रदेश)
७) हर्ष दिलीप बारूत (अहमदाबाद, गुजरात) यांचा समावेश आहे.
पोलीस तपासात असे समोर आले आहे की, हे संशयित “Payday” नावाच्या कर्ज देणाऱ्या कंपनीचे एजंट असल्याचे भासवून अमेरिकन (USA) नागरिकांना लक्ष्य करत होते. झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवून ते या नागरिकांना गंडा घालत असत. संशयित पीडित व्यक्तींकडून पैशांच्या बदल्यात सेफोरा (Sephora), मेसीज (Macy’s), ॲपल गिफ्ट कार्ड, रेझर गोल्ड आणि एक्सबॉक्स (Xbox) यांसारखी महागडी गिफ्ट कार्ड्स उकळत असत.
ही यशस्वी कारवाई पीएसआय शेरविन डिकोस्टा, पीएसआय मंदार गावकर, हेड कॉन्स्टेबल योगेश खांडेपारकर, यादेश गावडे, कॉन्स्टेबल इब्राहिम करोल, मयूर राणे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहा चारी व मिनिका यांनी केली.
सध्या सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पीएसआय मंदार गावकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.