हिंदु राष्ट्र समन्वय समितीची पोलीस महासंचालकांकडे मागणी
गोवा खबर: रमजानच्या काळात अनधिकृतपणे होणारी गोवंशाची वाहतूक व कत्तल रोखावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत डिचोली, वास्को आणि म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समिती निवेदनात म्हटते, ‘‘हिंदू धर्माच्या परंपरेनुसार गायीला गोमाता म्हणून पूजले जाते. गायींना धार्मिकदृष्ट्या देवतास्वरूप मानून त्यांचा सन्मान केला जातो; मात्र रमजान सणाच्या काळात, राज्यातील विविध भागांमध्ये बेकायदेशीरपणे गोवंशाची वाहतूक व गोहत्या होत असते. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल केल्याच्या घटना आढळून येतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
यासाठी राज्यात अनधिकृत गोवंश वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त व देखरेख व्यवस्था निर्माण करणे, राज्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी करणे, परवानाधारक कत्तलखान्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी प्राण्यांची कत्तल होऊ नये यासाठी कठोर कारवाई करणे, बेकायदेशीर गोवंश वाहतूक किंवा कत्तल करणार्या व्यक्ती अथवा संघटनांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार तात्काळ दंडात्मक कारवाई करावी.’’ मुरगाव तालुक्याचे उपजिल्हाधिकारी श्री. भगवंत करमळी यांना निवेदन देतांना सनातन संस्थेचे सर्वश्री रवींद्र साळगावकर, ‘परशुराम गोशाळे’चे श्री गजानन पाटील, हिंदु जनजागृती समितीचे यतिन बोरकर, आंतरराष्ट्रीय बजरंग दल-दाभोळी-गोवा अध्यक्ष महेश नुगलस यांची उपस्थिती होती.
डिचोली येथे उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना ‘भारत स्वाभिमान’चे सर्वश्री भरतेश गुलणवर, ‘भारत माता की जय’चे भोलानाथ गाड, विश्व हिंदू परिषदेचे कृष्णा मराठे, ह. भ. प. किरण तुलपुळे, हिंदु जनजागृती समितीचे गोविंद चोडणकर, हिंदुत्ववादी सदानंद भंडारी यांची उपस्थिती होती.