-
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते वाटप; ‘योगदानाचा हा सन्मान’ असल्याचे प्रतिपादन
गोवा खबर : गोवा मुक्तीसाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करत राज्य सरकारने त्यांच्या १६ वारसांना विविध सरकारी खात्यांमध्ये नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली. मंत्रालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ही पत्रे देण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी दिलेला त्याग अनमोल आहे आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य मिळवून देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य खाते, पशुसंवर्धन आणि जलस्रोत अशा विविध विभागांत या नेमणुका करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमाला गृह सचिव, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.