Connect with us

गोवा खबर

विद्याधीश तीर्थ स्वामी यांची सनातन संस्थेच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट

Published

on

विद्याधीश तीर्थ स्वामी यांच्या प्रवेशाच्या प्रसंगी सनातनचे पृथ्वीराज हजारे यांनी त्यांचे स्वागत केले.
Spread the love

गोवा खबर : सनातन संस्था रामराज्य निर्माण करण्यासाठी कृतीशील आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने स्वतःच्या घरात रामराज्य निर्माण केल्यास देशात रामराज्य निर्माण होण्यास विलंब होणार नाही, असे प्रतिपादन श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे २४ वे मठाधिपती विद्याधीश तीर्थ स्वामी यांनी केले. स्वामी यांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील मुख्य आश्रमाला सदिच्छा भेट दिली, या प्रसंगी स्वामीजींनी वरील गौरवोद्गार काढले.

सनातनचे पृथ्वीराज हजारे यांनी त्यांचे स्वागत केले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आणि सनातनचे साधक निषाद देशमुख यांनी स्वामीजींना आश्रमदर्शन करतांना सनातनच्या राष्ट्र आणि धर्म प्रसाराच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.

या वेळी श्री रामनाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष वल्लभ कुंकळ्ळीकर, समितीचे विधी सल्लागार अधिवक्ता राजेश तळावलीकर, समितीचे सदस्य  संजीव बाले आणि रुद्र कापडी, तसेच संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे गुरुजी संतोष आचार्य आणि वसंत आचार्य हेही उपस्थित होते. सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी स्वामीजींना आश्रमात येण्याविषयी श्री रामनाथ देवस्थान येथे जाऊन त्यांना प्रार्थना केली होती.

या वेळी स्वामीजींचे गुरु श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांच्या पादुकांचे पूजन सनातनचे साधक दांपत्य डॉ. पांडुरंग मराठे आणि मंगला मराठे यांनी केले. तसेच  विद्याधीश तीर्थ स्वामीजींची पंचारती केली. यानंतर हजारे यांनी स्वामीजींचासन्मान केला.

स्वामीजी म्हणाले, ‘सनातन संस्था सनातन धर्माचे रक्षण करणे आणि सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी कटीबद्ध आहे, हे पाहून खूप आनंद होतो. सनातन संस्था ‘इतरांचे जीवन आनंदी करून त्यामधून स्वत: आनंद घेणे’ या तत्त्वानुसार चालते. सनातन संस्था सर्वांना संघटित करून त्यांच्यामध्ये ईश्वर सेवेद्वारे धर्मजागृती करत आहेत. सनातनचे साधक प्रतिदिन देवाची उपासना करतात आणि सर्वाचे शुभ चिंततात. सत्संगाचे हे महत्त्व आहे.

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाला नुकतीच ५५० वर्षे पूर्ण झाली, या निमित्ताने २८ नोव्हेंबर २०२५ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मठाच्या परिसरातील श्रीरामाच्या ७७ फूट उंच कांस्य धातूच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले होते.