Connect with us

गोवा खबर

गोव्यात सार्वजनिक रुग्णालयांमध्ये एआयद्वारे १ लाखांहून अधिक छातीचे एक्स-रे तपासले गेले; १८ फुफ्फुसाच्या कर्करोगाची प्रकरणे आढळली

Published

on

Spread the love

गोवा खबर : नियमित छातीच्या एक्स-रेच्या एआय तपासणीत १०,५०० हून अधिक फुफ्फुसातील गाठी आढळल्या; निदानासाठी लागणारा वेळ ५० टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाला
गोवा सरकारने आज राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत राबवण्यात येत असलेल्या एआय-आधारित फुफ्फुस कर्करोग तपासणी कार्यक्रमाचे सुरुवातीचे निष्कर्ष जाहीर केले. या उपक्रमाअंतर्गत, सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये होणाऱ्या नियमित छातीच्या एक्स-रे तपासण्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे कोणतीही अतिरिक्त तपासणी किंवा रुग्णाला पुन्हा येण्याची गरज न पडता फुफ्फुसातील समस्या लवकर ओळखता येत आहेत.

भारतामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आजार उशिरा लक्षात येणे. गोव्यातील हा कार्यक्रम या समस्येवर उपाय करतो. सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये काढल्या जाणाऱ्या प्रत्येक छातीच्या एक्स-रेची एआयच्या मदतीने आपोआप तपासणी केली जाते, एक्स-रे कोणत्याही इतर कारणासाठी काढला असला तरीही यामुळे फुफ्फुसातील सुरुवातीची लक्षणे लवकर ओळखता येतात आणि डॉक्टरांना संशयास्पद फुफ्फुस कर्करोग रुग्णांची वेळेत तपासणी व पुढील उपचार सुरू करता येतात.

या कार्यक्रमाबद्दल बोलताना गोव्याचे माननीय आरोग्यमंत्री श्री. विश्वजीत राणे म्हणाले “सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आरोग्य विभाग लवकर निदान, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि कर्करोग तपासणी यावर सातत्याने काम करत आहे. नियमित तपासणी प्रक्रियेत एआयचा समावेश करून गोव्यात लवकर निदान अधिक प्रभावी आणि मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे. या कार्यक्रमामुळे रुग्णांवर कोणताही अतिरिक्त खर्च किंवा त्रास न वाढवता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉक्टरांना योग्य निर्णय घेता येत आहेत. लवकर निदान सर्वांसाठी उपलब्ध असले पाहिजे आणि ते भौगोलिक अंतर किंवा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसावे. सार्वजनिक आरोग्य सेवेत एआयचा वापर करणे म्हणजेच नागरिकांना वेळेवर, प्रभावी आणि समान आरोग्यसेवा देण्याचा पुढचा मार्ग आहे.”

हा कार्यक्रम गोव्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टरांच्या सहकार्याने राबवण्यात आला आहे. सरकारी रुग्णालयांतील पल्मोनोलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट यांनी एआय-आधारित प्राथमिक तपासणी कशी करायची याचे मार्गदर्शन केले आहे. ही पद्धत विद्यमान निदान प्रक्रिया आणि पुढील तपासणीच्या नियमांशी सुसंगत ठेवण्यात आली आहे.
कार्यक्रम सुरू झाल्यापासून, राज्यातील १८ सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये १,०६,२४८ छातीच्या एक्स-रे तपासल्या गेल्या आहेत. एआय प्रणालीने १०,५६४ फुफ्फुसातील गाठी ओळखल्या, ज्यामध्ये १,६१९ प्रकरणे उच्च धोका असलेली होती, ज्यामुळे डॉक्टरांना तातडीने तपासणी आवश्यक असलेल्या रुग्णांना प्राधान्य देता आले. आतापर्यंत या उपक्रमामुळे १८ फुफ्फुस कर्करोगाचे निश्चित निदान झाले असून, सरासरी निदानासाठी लागणारा वेळ ५० टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाला आहे.

क्युअर.एआय चे संस्थापक सदस्य आणि मुख्य उत्पादन अधिकारी अंकित मोदी म्हणाले,“ गोव्याचा हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे कारण यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आधीपासून उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर चांगले परिणाम साधले जात आहे. नियमित छातीच्या एक्स-रेच्या माध्यमातून रुग्णांना अतिरिक्त तपासण्या न करता किंवा रुग्णांवर अतिरिक्त भार न टाकता फुफ्फुसातील समस्या लवकर ओळखता येत आहेत. या परिणामांवरून हे स्पष्ट होते की, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य व्यवस्थेत समाविष्ट केलेले एआय तंत्रज्ञान निदानाची प्रक्रिया वेगवान करते आणि सार्वजनिक आरोग्य सेवेत वेळेवर उपचार मिळवून देण्यास मदत करते.”

प्रवीण राव अक्किनेपल्ली, कंट्री प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर, एस्ट्राझेनिका इंडिया, म्हणाले,“गोवा राज्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. गोवा आरोग्य सेवा विभाग आणि क्युअर.एआय यांच्यासोबत भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. एआयच्या मदतीने १ लाखांहून अधिक फुफ्फुस तपासण्या पूर्ण केल्याबद्दल आम्ही संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. यामुळे लवकर निदान आणि सर्वांसाठी समान आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा समान उद्देश अधोरेखित होतो. एस्ट्राझेनिका यांच्या वैज्ञानिक क्षमतेसोबत गोव्याचे सार्वजनिक आरोग्य नेतृत्व आणि क्युअर.एआयचे तंत्रज्ञान एकत्र येऊन आम्ही तंत्रज्ञान थेट रुग्णांपर्यंत पोहोचवत आहोत, उपचारांतील अडथळे कमी करत आहोत आणि संपूर्ण भारतभर विस्तारता येतील अशा डेटा-आधारित आरोग्य सेवा पद्धती उभारत आहोत, ज्यामुळे कर्करोग रुग्णांची लवकर ओळख होऊन त्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळू शकतात.”

गोव्या सरकारने या कार्यक्रमाचा विस्तार करण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये एआय-सक्षम तपासणी मोबाइल हेल्थ युनिट्स आणि समुदायातील आरोग्य सेवामध्ये वापरली जाईल. यामुळे संपूर्ण राज्यात लवकर निदान अधिक मजबूत होईल आणि राज्यभर कर्करोग उपचारांचे परिणाम सुधारण्याची सरकारची बांधिलकी अधिक दृढ होईल.

क्युअर.एआय बद्दल
क्युअर.एआय ही एक जागतिक स्तरावरील एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) कंपनी असून, आरोग्य क्षेत्रात लवकर निदान आणि उपचार व्यवस्थापनासाठी नवीन निदान उपाययोजना विकसित करते. क्युअर.एआयच्या उपाययोजनांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग, न्युरोलॉजी आणि संसर्गजन्य आजार लवकर ओळखता येतात, ज्यामुळे डॉक्टरांना मदत होते आणि औषधनिर्मिती व वैद्यकीय उपकरणांच्या उद्योगात प्रगती साधली जाते. ही कंपनी आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य व्यवस्थांना रुग्णांच्या आजार पटकन ओळखण्यास, उपचाराचे प्राधान्य ठरवण्यास आणि शेवटी रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा करण्यास सक्षम बनवते.

क्युअर.एआयचा विस्तार १०५ पेक्षा जास्त देशांमध्ये झाला आहे, आणि त्याचे प्रादेशिक कार्यालय न्यूयॉर्क, लंडन आणि मुंबई येथे आहेत. क्युअर.एआय ला TIME100 च्या २०२५ मधील सर्वाधिक प्रभावी कंपन्यांमध्ये स्थान मिळाले आहे.