गोवा खबर: १२व्या आयआयएचएम आंतरराष्ट्रीय यंग शेफ ऑलिम्पियाड (वायसीओ) २०२६ मध्ये सहभागी होणाऱ्या स्वीडन, पोर्तुगाल, जॉर्डन, फिलीपिन्स, भारत, युगांडा आणि नेपाळ येथील विद्यार्थी प्रतिनिधींशी गोवा सरकारचे पर्यटन मंत्रीरोहन खंवटे यांनी संवाद साधत त्यांचे औपचारिक स्वागत केले. या प्रसंगी प्रतिनिधींनी आपापल्या देशांचे राष्ट्रीय ध्वज मंत्र्यांना सादर केले. ही कृती मैत्री, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय सद्भावनेचे प्रतीक असून, यंग शेफ ऑलिम्पियाडच्या ‘पाककूटनीती’च्या भावनेचे प्रतिबिंब आहे.
हा संवाद वायसीओ २०२६ च्या अनुषंघाने झाला. या स्पर्धेचे उद्घाटन बेंगळुरू येथे भव्य समारंभात झाले असून त्यात जगभरातील सहभागी, पाककलेची सादरीकरणे आणि नवकल्पनांच्या माध्यमातून खाद्यसंस्कृती साजरी करण्याचा समान संकल्प दिसून आला. ४० हून अधिक देशांतील तरुण शेफ आणि मार्गदर्शक भारतात एकत्र आल्याने ही स्पर्धा जगातील उदयोन्मुख पाककला प्रतिभेचे एक मोठे व्यासपीठ ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे स्वागत करताना पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे म्हणाले, “अशा जागतिक उपक्रमांमुळे संस्कृती आणि समुदायांमध्ये दुवा निर्माण करण्याच्या गोव्याच्या पर्यटन दृष्टीकोनाला बळ मिळते. गोव्याचे पर्यटन केवळ ठिकाणे किंवा अनुभवांपुरते मर्यादित नसून, परस्पर समज, आदर आणि दीर्घकालीन संबंध वाढवणाऱ्या अर्थपूर्ण संवादावर आधारित आहे. प्रवासाप्रमाणेच पाककलेलाही सीमा ओलांडून लोकांना एकत्र आणण्याची ताकद आहे. यंग शेफ ऑलिम्पियाडसारखी व्यासपीठे भारताची जागतिक सांस्कृतिक व ज्ञानविनिमयाचे यजमान राष्ट्र म्हणून भूमिका अधोरेखित करतात आणि तरुण व्यावसायिकांना विविध पाकपरंपरा, संस्कृती आणि दृष्टीकोन जाणून घेण्याची संधी देतात. यामुळे जागतिक जाणीव असलेली, संस्कृतीविषयी संवेदनशील आणि सहकार्य व आदराच्या मूल्यांवर आधारित नवी पिढी घडते.”
स्वीडन, पोर्तुगाल, जॉर्डन, फिलीपिन्स, भारत, युगांडा आणि नेपाळ येथील प्रतिनिधींनी या उबदार स्वागताबद्दल आभार मानले आणि राष्ट्रीय ध्वज सादर करण्याचा हा उपक्रम ‘विविधतेतील एकता’ दर्शवतो, असे नमूद केले.
भारतामध्ये संकल्पित होऊन आज जागतिक स्तरावर ओळख मिळवलेल्या यंग शेफ ऑलिम्पियाड २०२६ मध्ये संस्कृती, पाककला आणि मैत्री यांचा संगम घडतो. स्पर्धा विविध दिवस आणि शहरांमध्ये सुरू असताना, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि भारतीय पर्यटन नेतृत्व यांच्यातील हा संवाद आदरातिथ्याच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याच्या सामायिक बांधिलकीला अधोरेखित करतो. अन्न ही एक सार्वत्रिक भाषा असून ती देशोदेशींच्या सीमा ओलांडून लोकांना जोडते, हा संदेश यातून अधिक बळकट होतो.