गोवा खबर : गोवा राज्यातील टपाल कार्यालयांमध्ये ग्रामीण डाक सेवक पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी डाक विभागाने पात्रतेचे निकष सुधारित केले आहेत. नव्या तरतुदीनुसार, गोवा राज्यात ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत कोंकणी किंवा मराठी विषयाचे अध्ययन केलेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांनी केवळ मराठी विषयाचे अध्ययन केले आहे, अशा उमेदवारांना कोंकणी भाषेचे प्राविण्य असणे आवश्यक आहे. या प्राविण्याची पडताळणी गोवा कोंकणी अकादमी किंवा गोवा राज्य सरकारने या उद्देशासाठी नामनिर्देशित केलेल्या प्राधिकरणाने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात येणार आहे.
सुधारित निकषांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागांमध्ये स्थानिक नागरिकांशी प्रभावी संवाद साधून टपाल सेवांचा शेवटच्या टप्प्यापर्यंत (लास्ट-माईल डिलिव्हरी) पुरवठा अधिक सक्षम करणे हा आहे. गोवा राज्य सरकारच्या सहकार्याने हा निर्णय घेण्यात आला असून, ग्रामीण डाक सेवक भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंबंधी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीचे निराकरण या माध्यमातून करण्यात आले आहे.
दरम्यान ग्रामीण डाक सेवक ऑनलाइन भरती वेळापत्रक जानेवारी 2026 अंतर्गत विविध टप्प्यांसाठी कालमर्यादा जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांची ऑनलाइन नोंदणी 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 या कालावधीत करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे व शुल्क भरण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी 18 व 19 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत देण्यात आली असून, पहिली तात्पुरती यादी 28 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन गोवा डाक विभागाकडून करण्यात आले आहे.