गोवा खबर : राज्य नियुक्त दृष्टी मरीन लाईफसेव्हिंग एजन्सीने समुद्र सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नुकताच ‘सागर सफर’ हा मार्गदर्शित उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात आतापर्यंत सुमारे ८०० स्थानिक नागरिक व पर्यटकांनी सहभाग घेतला असून, ही सत्रे सर्वांसाठी पूर्णतः मोफत आहेत, अशी माहिती दृष्टी मरीनकडून देण्यात आली आहे.
या उपक्रमाद्वारे सहभागींस विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये समुद्रात सुरक्षित कसे राहावे, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येते. समुदाय-केंद्रित असलेल्या या उपक्रमात प्रशिक्षित लाइफसेव्हर्सच्या मार्गदर्शनाखाली सहभागी समुद्रात उतरून समुद्राचे वर्तन, प्रवाहांची दिशा तसेच आवश्यक सुरक्षा नियम समजून घेण्याची प्रत्यक्ष अनुभवाधारित संधी मिळते.
१५ नोव्हेंबर २०२५ पासून गोव्यातील सहा प्रमुख आणि लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांवर राबविण्यात आलेल्या ‘सागर सफर’ उपक्रमात एकूण ८०८ सहभागी सहभागी झाले आहेत. या उपक्रमाला कोलवा समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून, येथे तब्बल ७१९ जणांनी सागर सफर सत्राचा अनुभव घेतला. त्याखालोखाल बाणावली समुद्रकिनारा (३३ सहभागी), शिकेरी (३५), कांदोळी (११), बागा (८) आणि कळंगुट (२) असा सहभागाचा क्रम नोंदवण्यात आला आहे.
दररोज सकाळी ११ वाजता आणि दुपारी ४ वाजता आयोजित केली जाणारी ही एक तासांची ‘सागर सफर’ सत्रे सहभागींच्या मनातील समुद्राविषयीची भीती दूर करणे, समुद्रातील प्रवाहांची समज वाढवणे, ध्वज प्रणालीची ओळख करून देणे तसेच सुरक्षित व जबाबदारीने समुद्रात उतरण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने रचना करण्यात आली आहेत. हा उपक्रम स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठीही खुला असून, तो पूर्णतः दृष्टी मरीनच्या प्रशिक्षित आणि अनुभवी लाइफसेव्हर टीमच्या सततच्या देखरेखीखाली राबवला जातो.
सत्रांबाबत माहिती देण्यासाठी ‘ऑरस एआय-बॉट’चा वापर करण्यात येतो. ‘ऑरस’ ही समुद्रावर गस्त घालणारी एआय प्रणाली असून, ती या सत्रांची माहिती विविध भाषांमध्ये घोषणा करून देते. तसेच इच्छूक मुद्रकिनाऱ्यांवरील ड्युटीवर असलेल्या लाइफसेव्हर्सकडे थेट नोंदणी करू शकतात.
“शिकेरी समुद्रकिनाऱ्यावरचा ‘सागर सफर’ अनुभव अतिशय सुंदर, सुरक्षित आणि मनमोहक आहे. या उपक्रमातून दृष्टी मरीनने समुद्रकिनाऱ्यावरच पर्यटकांना एक वेगळा, सुरक्षित आणि संस्मरणीय पोहण्याचा अनुभव उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येकाने हा अनोखा अनुभव किमान एकदा तरी नक्की घ्यावा,” असे ‘सागर सफर’ सत्रात सहभागी झालेले पर्यटक प्रशांत ठाकरे यांनी सांगितले.
प्रत्येक सत्राची सुरुवात सुरक्षा सूचना देऊन केली जाते. त्यानंतर तरंगता सहाय्यक साधने आणि लाइफ जॅकेट्सच्या वापरासह मार्गदर्शित पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सत्राच्या शेवटी लाइफसेव्हर्स समुद्राचे वर्तन, रिप करंट्सची ओळख आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या प्राथमिक उपायांची सविस्तर माहिती देतात.
“जेव्हा लोकांना समुद्रातील प्रवाह, ध्वज प्रणाली आणि सुरक्षित पोहण्याच्या मर्यादांची योग्य माहिती मिळते, तेव्हा ते पाण्यात अधिक सजग आणि योग्य निर्णय घेतात. आम्हाला मिळालेल्या प्रतिसादावरून असे स्पष्ट होते की पर्यटक स्वतःच्या सुरक्षिततेविषयी शिकण्यास तसेच त्याची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक आहेत,” असे दृष्टी मरीन मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन अवस्थी यांनी सांगितले.
हा उपक्रम बुडण्याच्या घटनांमध्ये घट घडवून आणण्याच्या आणि स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये समुद्र साक्षरता वाढवण्याच्या व्यापक उद्दिष्टाशी सुसंगत आहे. मॉन्सून काळात समुद्रात पोहण्यास मनाई असते, त्या कालावधीचा अपवाद वगळता, हे मार्गदर्शित पोहण्याचे सत्र वर्षभर आयोजित करण्यात येतात.