-
सामाजिक सलोखा बिघडविल्यास कठोर कारवाई
गोवा खबर : राज्यात जबाबदार पर्यटनाचा विस्तार करून दर्जात्मक पर्यटकांनी सर्वांगसुंदर गोव्याची भटकंती करावी यासाठी पर्यटन खात्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आध्यात्मिक, वेलनेस, योगा तसेच इको व आंतरग्राम पर्यटनाला चालना देणारे नवनवे उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती आज पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गोवा विधानसभेत दिली. त्याचवेळी बेकायदा, आक्षेपार्ह, अनैतिक किंवा सार्वजनिक सुव्यवस्था तथा सामाजिक सलोखा किंवा राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांवर आघात करणाऱ्या पर्यटन कार्यक्रमांवर सरकारने शून्य-सहिष्णुतेचे धोरण अवलंबिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘कामसूत्र ख्रिसमस’ नावाखाली एका कार्यक्रमाची माहिती पर्यटन विभागाच्या निदर्शनास आल्यावर, त्याची तात्काळ चौकशी करण्यात आली. त्या कार्यक्रमासाठी खात्याने कोणतीही परवानगी दिली नव्हती, असे खंवटे यांनी स्पष्ट केले. प्रथमदर्शनी, हा कार्यक्रम आध्यात्मिक मेळाव्याच्या नावाखाली आक्षेपार्ह आणि अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणारा असल्याचे दिसून आले. सार्वजनिक उपद्रव आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारा कार्यक्रम असल्याने, या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल केल्याची माहिती मंत्री खंवटे यांनी दिली.
त्यानुसार तातडीने तपास करून कायद्याच्या संबंधित चौकटीनसार अशा प्रकारच्या कृतींना प्रतिबंध करण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी आयोजकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावरून बेकायदा किंवा सार्वजनिक सलोख्याला हानी पोचविणार्यांआड सरकारचे शून्य सहिष्णुता धोरण स्पष्ट होत असल्याचे खंवटे यांनी नमूद केले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्यासह आमदार विजय सरदेसाई, विरेश बोरकर, कार्लुस फरेरा व व्हेन्झी व्हिएगस यांनी सभागृहात मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेला पर्यटनमंत्री खंवटे उत्तर देत होते. पर्यटन विभाग गोव्याच्या पर्यटनाचे स्वरूप बदलण्यासाठी सातत्याने काम करत असून, बेजबाबदार आणि कमी-मूल्याच्या पर्यटनाला प्रोत्साहन न देता, गुणवत्तापूर्ण, शाश्वत आणि सांस्कृतिकदृष्ट्या राज्यासाठी पूरक पर्यटनावर खात्याने लक्ष केंद्रित केल्याचे खंवटे यांनी स्पष्ट सांगितले.
पर्यटनाच्या क्षेत्रात आध्यात्मिक, आरोग्य, वारसा आणि निसर्गाधारित अनुभवांवर भर दिला जात असल्याची माहितीही खंवटे यांनी दिली. या संदर्भात, विभागाने अनेक संरचित आणि धोरणात्मक कार्यक्रम सुरू केल्याचे सांगताना खंवटे म्हणाले की, समुद्रापल्याडचा गोवा ही नवी संकल्पना राज्याने स्विकारली आहे.
गोव्यातील मंदिरे, चर्च, वारसा गावे, सांस्कृतिक परंपरा, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि कमी-ज्ञात स्थळे प्रदर्शित करण्यावर सरकारचा विशेष भर आहे. पुनरुत्पादक पर्यटन उपक्रमाखाली जबाबदार पर्यटक, सामुदायिक सहभाग, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांना आर्थिक लाभांवर लक्ष केंद्रित केल्याचा पुनरूच्चार खंवटे यांनी विधानसभेत सांगितले.
योगसाधना, ध्यान, आयुर्वेद, निसर्गोपचार आणि सर्वांगीण आरोग्याच्या अनुभवांसह आध्यात्मिक आणि आरोग्य पर्यटनाला नियमबद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या योग्य चौकटीत प्रोत्साहन देत, गोव्यातील मंदिरे, चर्च आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांचा समावेश असलेल्या वारसा आणि तीर्थक्षेत्र सर्किट्सचा विकास करण्यावरही पर्यटन खात्याने विशेष भर दिला आहे.
वनभ्रमण मार्ग, धबधबे, जैवविविधता हॉटस्पॉट आणि ग्रामीण पर्यटन क्लस्टर्ससह पर्यावरण-पर्यटन आणि निसर्ग-आधारित पर्यटनाला बळकटी देण्यावरही खात्याने लक्ष दिले असून, गुणवत्तापूर्ण पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, विभागाने आपल्या आंतरराष्ट्रीय विपणन प्रयत्न वाढविले आहेत.
सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील बाजारपेठांवर लक्ष देताना, नॉर्वे, डेन्मार्क, पोलंड आणि व युरोपीय राष्ट्रांमध्ये गोव्याच्या पर्यटन विस्तार करण्यावर लक्ष दिले आहे. जाहिराती, आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल मार्ट्समधील सहभाग, रोड शो आणि डिजिटल मोहिमांद्वारे धोरणात्मकपणे लक्ष केंद्रित करून गोव्यातील विदेशी पर्यटकांची संख्यावाढीकडे अधिक भर दिल्याचे खंवटे यांनी सांगितले.
गोव्यातील पर्यटन विकास सुव्यवस्थित, कायदेशीर, सांस्कृतिकदृष्ट्या आदरपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील, तसेच राज्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या किंवा सार्वजनिक नैतिकता आणि सामाजिक सुव्यवस्थेशी तडजोड करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही खंवटे यांनी दिला.