Connect with us

गोवा खबर

लग्नसमारंभात संगीत लावण्यावरून होणारी दादागिरी खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री 

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील लग्नसोहळे आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये कॉपीराइटच्या नावाखाली संगीत थांबवण्याचा किंवा आयोजकांना त्रास देण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत मांडली. आमदार विजय सरदेसाई यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही काळापासून पीपीएल (PPL) आणि नोव्हेक्स (Novex) सारख्या खासगी कंपन्या कॉपीराइट परवान्याच्या नावाखाली लग्नसोहळ्यात हस्तक्षेप करून संगीत बंद पाडत आहेत. यावर भाष्य करताना विजय सरदेसाई यांनी या प्रकाराला ‘एक प्रकारची खंडणी’ म्हटले. त्यांनी लक्ष वेधले की, कॉपीराइट कायदा, १९५७ च्या कलम ५२ (१) (झेडए) नुसार अशा सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना कॉपीराइट शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांची पावले:

 * पोलिस तक्रार: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, जर कोणत्याही कंपनीला आक्षेप असेल तर त्यांनी थेट पोलिसात जावे, पण कार्यक्रम थांबवू नये.

 * पैसे वसुली: आमदार वेंझी व्हिएगश यांच्या सूचनेनुसार, आतापर्यंत अशा कंपन्यांनी लोकांकडून जे पैसे उकळले आहेत, ते वसूल करून परत मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल.

 * कायमस्वरूपी तोडगा: या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाला पत्र लिहिणार आहे. तसेच गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन नवीन परिपत्रक जारी केले जाईल.