गोवा खबर : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमधील भीषण अग्निकांड प्रकरणातील प्रमुख संशयित आणि फरार क्लबमालक गौरव व सौरभ लुथरा यांना बुधवारी सकाळी दिल्लीहून गोव्यात आणण्यात आले. त्यांच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला असून, त्यांना मदत करणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
लुथरा बंधूंना म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी १० दिवसांची कोठडी मागितली होती; मात्र न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
कडक पोलिस बंदोबस्त
मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तसेच हणजूण पोलिस ठाण्यात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विमानतळाबाहेर व आत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते. संशयितांना हणजूण पोलिस ठाण्यात नेईपर्यंत संपूर्ण मार्गावर कडक सुरक्षा होती. पोलिस ठाण्याच्या परिसरात बाहेरील व्यक्तींना प्रवेशास मनाई करण्यात आली होती.