थलाईवर यांनी चित्रपटसृष्टीत 50 वर्षे केली पूर्ण: 56 व्या इफ्फीमध्ये रजनीकांत यांचा सत्कार
गोवा खबर:56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अतिशय संस्मरणीय टप्पा साजरा करताना चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीची 50 वर्षे पूर्ण करणारे दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचा सत्कार केला. थलाईवर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रजनीकांत यांनी पडद्यावरील करिष्मा, वैशिष्ट्यपूर्ण शैली आणि अभूतपूर्व अदाकारीने प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
या चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात रजनीकांत यांनी भारतीय चित्रपटाला दिलेल्या योगदानाला अर्थात केवळ तमिळ भाषेतीलच नव्हे तर हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटातील त्यांच्या कारकिर्दीला सन्मानित करण्यात आले. सुमारे 170 चित्रपट दिलेल्या या महान सुपरस्टारने लोकप्रिय लोकप्रिय संस्कृतीवर अमिट छाप सोडली असून त्यांना पद्मभूषण (2000), पद्मविभूषण ((2016) आणि दादासाहेब फाळके पुरस्कार (2020) यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शाल आणि सन्मानचिन्ह प्रदान करुन रजनीकांत यांचा सत्कार केला. यावेळी माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि अभिनेता रणवीर सिंग उपस्थित होते.
हा पुरस्कार स्वीकार करताना रजनीकांत यांनी केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार मानले. गेल्या 50 वर्षांकडे बघितल्यावर अगदी 10 ते 15 वर्षेच झाल्यासारखे वाटते, कारण आपण चित्रपट आणि अभिनय या दोन्हींवर तितकेच उत्कट प्रेम करतो, मला शंभर जन्म मिळाले, तरी मला रजनीकांत म्हणूनच जन्म घ्यायला आवडेल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
या समारंभाच्या माध्यमातून इफ्फी 2025 ने एका अशा सांस्कृतिक हस्तीचा सन्मान केला आहे ज्याच्या अदाकारीने भाषा आणि भौगोलिक सीमा पार करून, अनेक चित्रपटनिर्माते आणि प्रेक्षकांना सारखीच प्रेरणा दिली आहे. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव हा केवळ त्यांच्या व्यक्तिगत कामगिरीला अधोरेखित करत नाही तर भारतीय लोकप्रिय संस्कृतीला आकार देणाऱ्या परिवर्तनकारी सामर्थ्याचे ते प्रतीक आहे.