Published
8 months agoon
गोवा खबर:गोव्यात आज 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ भावनात्मक वातावरणात पार पडला. या महोत्सवाच्या निमित्ताने भारताने गेल्या वर्षभरात भारतीय सिनेमा, संगीत, नाटक आणि सर्जनशील कला क्षेत्रातील निधन झालेल्या अनेक दिग्गज व्यक्तीमत्वांना आदरांजली वाहिली. यावेळी ज्या कलाकारांच्या योगदानाने देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रावर अमिट छाप सोडली आहे, अशा कलाकारांचा सन्मान करणारी एक विशेष चित्रफितही दाखवली गेली.
56 वा इफ्फी सुरू असतानाच, दिनांक 24 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. ही आदरांजली वाहत असताना वातावरण शोकाकुल झाले होते. यंदाच्या इफ्फीत अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, नाट्यकर्मी आणि सर्जनशील क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांतील कलाकारांना आदरांजली वाहिली गेली. यातून भारताच्या कलात्मक वारशाचा विस्तार आणि वैविध्याचेही दर्शन घडले. आदरांजली वाहिली गेलेले प्रत्येक व्यक्तीमत्व म्हणजे आजीवन जपलेली तडफ, समर्पण भाव आणि सर्जनशीलतेतील उत्कृष्टतेचे प्रतिनिधित्व होते.
या समारोप समारंभात आदरांजली वाहिली गेलेल्या कलाकारांविषयी :
धर्मेंद्र : भारतीय सिने जगतातील एक आघाडीचे दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेल्या धर्मेंद्र यांनी प्रणय, नाट्यमयता ते ॲक्शन अशा सर्वच प्रकारांमध्ये दमदार अभिनय साकारला. या महोत्सवादरम्यानच त्यांचे निधन झाल्याने भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती.
कामिनी कौशल: हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगातील एक प्रसिद्ध कलाकार असलेल्या कामिनी कौशल, पडद्यावरील चिरस्थायी अस्तित्वासाठी ओळखल्या जात होत्या. सात दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीने अनेक पिढ्यांतील कलाकारांना प्रेरणा दिली.
सुलक्षणा पंडित: एक प्रतिभावान आणि दैवी आवाजाचा वरदहस्त लाभलेल्या गायिका सुलक्षणा पंडित यांच्या मधुर आवाजाने असंख्य संस्मरणीय हिंदी चित्रपट गीतांना एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. एक अभिनेत्री म्हणूनही 1970 आणि 1980 च्या दशकातील त्यांच्या भूमिकांनी भावनिक बंध निर्माण केले होते.
सतीश शाह : सिनेमा आणि भारतीय दूरचित्रवाणी या दोन्ही क्षेत्रांतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व, विनोदाचे अफलातून टायमिंग आणि अविस्मरणीय भूमिकांसाठी ते कायमच नावाजले गेले. त्यांच्या अभिनयाला पिढ्यानपिढ्यांच्या प्रेक्षकांनी कायमच दाद दिली आहे.
पीयूष पांडे: भारतीय जाहिरात क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तमत्व. त्यांच्या अफलातून जाहिरात मोहिमा आणि अफलातून सर्जनशील अभिव्यक्तीने जाहिरात उद्योगाक्षेत्राला खऱ्या अर्थाने आकार दिला.
ऋषभ टंडन : एक सळसळती सांगितीक प्रतिभा लाभलेले व्यक्तिमत्व. मंत्रमुद्ध करणारा आवाज आणि समकालीन सर्जनशील शैलीसाठी ते ओळखले जात. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने स्वतंत्र संगीत समुदायात मोठी पोकळी निर्माण झाली.
गोवर्धन असरानी : ते असरानी या नावानेच सर्वदूर ओळखले जात होते. भारतीय सिने जगतील सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी ते एक होते. विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिकांमधला त्यांचा वावर अत्यंत सहज आणि नैसर्गिक होता. त्यांच्या दिग्दर्शनीय कलाकृतींनीही त्यांच्या या बहुआयामी कारकिर्दीत मोलाची भर घातली.
पंकज धीर: भारतीय दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमधील आपल्या अजरामर आयकॉनिक भूमिकांसाठी ते ओळखले जात. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्राला एक गांभीर्य आणि प्रतिष्ठा मिळवून दिली होती.
वरिंदर सिंग घुमन: पेशाने शरीसौष्ठव क्षेत्रात असलेले वरिंदर सिंग घुमन नंतर अभिनय क्षेत्रात आले. पडद्यावरील त्यांचे भारदस्त अस्तित्व आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व रसिकांच्या पसंतीस उतरले होते.
जुबीन गर्ग : अद्भूत आवाजाचे व्यक्तिमत्व. आपल्या अपवादात्मक गायन आणि वैविध्यपूर्ण संगीतमुळे त्यांनी देशभरात प्रचंड लोकप्रियता कमावली होती. आसामी आणि भारतीय पॉप संगीतावरचा त्यांचा प्रभाव निव्वळ बिनतोड होता.
बाळ कर्वे: मराठी रंगभूमी आणि सिनेमातील एक आदरणीय कलाकार. अत्यंत नेटकी अभिनय शैली आणि संस्मरणीय रंगमंचीय भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. त्यांच्या योगदानाने प्रादेशिक कथात्मक मांडणीच्या परंपरेला समृद्ध केले होते.
जसविंदर भल्ला: पंजाबी सिनेमातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व. आपल्या उत्कृष्ट विनोदी अभिनयाने आणि लोकांना आपल्याशा वाटणाऱ्या साकारलेल्या भूमिकांमुळे, त्यांना लोकांचे प्रचंड प्रेम लाभले होते.
ज्योती चांदेकर : चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातल्या कसलेल्या अभिनेत्री ही त्यांची ओळख. मराठी सिनेमात त्यांनी साकारलेल्या भावनात्मक भूमिकांनी रसिकांची वाहवा मिळवली होती.
रतन थियम: मणिपुरी रंगभूमीतील एक जागतिक किर्तीचे व्यक्तिमत्त्व, पारंपरिक कलाप्रकाराचा समकालीन अभिव्यक्तीसोबत मिलाफ घडवून आणणारे कलाकार म्हणून ते ओळखले जात.
बी. सरोजा देवी: दक्षिण भारतीय सिनेमातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक. त्यांनी कन्नड, तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले होते.
शेफाली जरीवाला: लोकप्रिय संगीत संग्रह आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून त्यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली होती. भारतीय पॉप संस्कृतीतील त्या एक परिचित व्यक्तिमत्व होत्या.
पार्थो घोष: पार्थो घोष यांनी 1990 आणि 2000 च्या दशकात अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. व्यावसायिक चित्रपट निर्मितीप्रती असलेल्या संवेदनशीलतेसाठी ते ओळखले जात होते.
विभू राघव : दूरचित्रवाणीवरील एक युवा आणि आश्वासक अभिनेते, छोट्या पडद्यावरील त्यांचे उत्साहपूर्ण अस्तित्व आणि लोकांना आपल्याशा वाटाव्यात अशा भूमिका प्रशंसेला पात्र ठरल्या होत्या.
चंद्रकांत: तेलुगू दूरचित्रवाणीतील एक परिचित चेहरा, आपल्या आश्वासक अभिनयासाठी आणि भूमिकेप्रती समर्पणासाठी ते ओळखले जात होते.
शाजी एन. करुण : मल्याळम सिनेमातील एक दिग्गज प्रतिभावान व्यक्तिमत्व. त्यांच्या कथात्मक मांडणीच्या त्यांच्या काव्यमय दृश्य शैलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली होती.
मनोज कुमार: आपल्या देशभक्तीपर भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्गज व्यक्तिमत्व. देशभक्तीपर सिनेमातील योगदानासाठी ते ओळखले जात. त्यांचे चित्रपट आजही अभिमान जागृत करतात आणि सांस्कृतिक ओळखीला प्रेरणा देतात.
आलोक चॅटर्जी : भारतीय रंगभूमीवरील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, रंगभूमीप्रती आपल्या समर्पणातून , त्यांनी असंख्य कलाकारांना घडवले, प्रेरित केले.
श्याम बेनेगल : भारतीय समांतर सिने जगमातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांच्या पारंपरिक चौकट मोडणाऱ्या कथा आणि चित्रपटीय परिभाषेने आधुनिक भारतीय चित्रपट निर्मितीला खऱ्या अर्थाने आकार दिला.
झाकीर हुसेन: जागतिक किर्तीचे लोकप्रिय तालवादक, तबल्याला जागतिक ओळख मिळवून देण्यात त्यांनी दिलेले योगदान गौरवपूर्ण आहे. त्यांच्यातील कलात्मकतेने विविध संस्कृतींमध्ये दुवा साधण्याचे काम केले, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची नवी परिभाषा रचली.
Valpoi Police Seize Ganja Worth ₹5 Lakh; Two Arrested from Orissa
MLA Viresh Borkar Halts Alleged Illegal Road Construction in Curca
साळावली जल प्रकल्पातून मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा
Congress and Goa Forward Party to Strengthen Alliance in the Larger Interest of Goa
Aam Aadmi Party Goa’s Alliance Coordination Committee meets in Panaji; every effort to be made for opposition alliance
WAR ON DRUGS! Goa CM Pramod Sawant Mobilizes State Machinery in Massive Push For a ‘Drug-Free Goa’ Under PM Modi’s Vision!