गोवा खबर : वाळपई येथील महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडत असून माजी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष अर्जुन आप्पा गुरव यांनी त्यांच्या समर्थकांसह आम आदमी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. आप गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर आणि आप सरचिटणीस श्रीकृष्ण परब यांनी पक्षाचा पंचा देऊन त्यांचे आम आदमी पार्टीमध्ये अधिकृत स्वागत केले.
अर्जुन गुरव यांच्यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण समर्थकांनीही आपमध्ये प्रवेश केला. यामध्ये गणेश चोर्लेकर, प्रमोद गावकर, अमरनाथ कोपर्डेकर, तुळशीदास गावकर, लक्ष्मण गावकर यांचा समावेश आहे. या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे सत्तरीमध्ये आपच्या वाढत्या संघटनात्मक ताकदीला गती आणि बळकटी मिळाली आहे.
जाहीर पक्षप्रवेश झाल्यानंतर अर्जुन गुरव यांनी भागातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे लक्ष वेधले. सत्तरीमध्ये अद्यापही सुरक्षित रस्ता, वीज पुरवठा, शेती आणि इतर महत्त्वाच्या स्थानिक विषयांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. भाजपचे मंत्री विश्वजित राणे नागरिकांच्या या समस्या सोडवण्याबाबत उदासीन आहेत. त्यामुळेच या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही.
ते पुढे म्हणाले की, आपने आता सत्तरीमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आहे. गोव्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, कोण कुणासोबत उभे राहील हे सांगणे कठीण आहे. अविश्वासार्ह नेत्यांच्या मागे जाण्यापेक्षा आम्ही आम आदमी पक्षाला आमची पसंती दिली आहे. कारण केवळ याच पक्षाने भाजपविरुद्ध सातत्यपूर्ण लढा दिला आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की, दर्जेदार आरोग्यसेवा आणि शिक्षणावर ‘आप’चा भर असल्याने तसेच प्रशासनातील त्यांच्या विश्वासार्हतेमुळे त्यांना आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पक्षात सामील होण्यास प्रेरित केले.
आप नेत्यांनी नवीन प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. वाळपई आणि सत्तरीमध्ये पक्षाच्या विस्तारासाठी हे एक मोठे पाऊल ठरेल, अशी आशा आप नेत्यांनी यावेळी व्यक्त केली.