गोवा खबर : फिडे चेस वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा यावर्षी ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या काळात गोव्यात पार पडणार आहे. तब्बल २३ वर्षांनंतर ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा भारतात आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा हडफडे बार्देश येथील रीसॉर्ट रिओ येथे होणार असून, ८२ देशांतील २०६ खेळाडू यात सहभागी होतील. ही स्पर्धा ‘नॉक-आउट’ स्वरूपात खेळवली जाणार असून आणि विजेत्याला तब्बल २ मिलियन डॉलर्सचे पारितोषिक मिळणार आहे!

वर्ल्ड कपचा विजेता केवळ विजेतेपदच नाही तर २०२६ च्या कॅंडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्र ठरणाऱ्या तीन खेळाडूंमध्ये आपले स्थान मिळवेल त्यामूळे ही स्पर्धा म्हणजे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपकडे जाण्याची अंतिम पायरी आहे.

या स्पर्धेत जगातील नामवंत खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. गुकेश डी, अर्जुन एरिगैसी, प्रग्नानंदा आर, अनिश गिरी, वेस्ली सो, विन्सेंट केमर, हान्स नीमन, नोदीरबेक अब्दुसत्तोरोव, इयान नेपोम्नियाची, रिचर्ड रॅपोर्ट, विदित गुजराथी, निहाल सरीन आणि इतर अनेक दिग्गज खेळाडू यात सहभागी होणार आहेत.
यंदाच्या स्पर्धेत विशेष आकर्षण ठरणार आहे फॉस्टिनो ओरो, हा फक्त १२ वर्षांचा अर्जेंटिनाचा बुद्धिबळपटू, जो फिडे चेस वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात लहान वयाचा सहभागी ठरणार आहे. तसेच, भारताची उदयोन्मुख खेळाडू दिव्या देशमुख हिला वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे संधी मिळाली असून ती ‘ओपन सेक्शन’मध्ये खेळणार आहे.
२००२ नंतर प्रथमच भारतात परतणारा हा वर्ल्ड कप देशातील वाढत्या बुद्धिबळप्रेम आणि नव्या पिढीतील ग्रँडमास्टरांच्या जागतिक यशाची साक्ष देतो. गोव्याची समृद्ध संस्कृती, सजीव वातावरण आणि निसर्गरम्यता या भव्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेला अविस्मरणीय पार्श्वभूमी देणार आहेत.
लोगोविषयी माहिती
फिडे वर्ल्ड कप गोवा २०२५ साठी तयार केलेला लोगो हा गोव्याच्या किनारपट्टीवरील मोहक सौंदर्य आणि बुद्धिबळाच्या रणनीतिक सौंदर्याचा सुंदर संगम आहे. हिरव्या रंगाच्या भागात पांढरे नारळाचे झाड दाखवले आहे, खाली निळी लाट आहे. लाल रंगाच्या पॅनेलमध्ये पांढऱ्या चौकटींनी बनवलेला हिऱ्याच्या-आकाराचा नमुना आहे जो बुद्धिबळाच्या पटाचे प्रतिकात्मक दर्शन घडवतो. पिवळ्या पॅनेलमध्ये वाकलेल्या किरणांसह एक स्टाईलायझ्ड सूर्य दाखवला आहे. या लोगोमध्ये गोव्याची संस्कृती, उब आणि रंगतदार ओळख जिवंतपणे दिसून येते.
गीताची माहिती (एन्थम)
या स्पर्धेचे अधिकृत गीत प्रसिद्ध गायक दलैर मेहंदी यांनी गायले आहे. पहिल्यांदाच भारत फक्त आयोजक नाही, तर नायक म्हणूनही उभा आहे. प्रत्येक भारतीय खेळाडू, तानिया, गुकेश, हम्पी आणि विदित, हे भारतीय बुद्धिबळाच्या प्रवासातील प्रतिभा, परंपरा, बुद्धिमत्ता आणि प्रेरणा ह्या स्तंभांचे प्रतिनिधित्व करतात.