Connect with us

गोवा खबर

सर्व शक्यतांचे प्रवेशद्वार म्हणून आयटीबी आशिया २०२५ मध्ये गोव्याची किर्ती

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतातील आघाडीचे पर्यटन राज्य गोवा, आयटीबी आशिया २०२५ या आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी आपल्या अनोख्या “रिजनरेटिव्ह टुरिझम” मॉडेलसह झळकले. या मॉडेलद्वारे गोवाने संस्कृती, कनेक्टिव्हिटी, वेलनेस, इको-टुरिझम आणि शाश्वत विकासावर भर देत आकर्षक पद्धतीने आपले सादरीकरण केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे सिंगापूरमधील उच्चायुक्त डॉ. शिल्पक अंबुले यांच्या हस्ते झाले. त्यांच्या सोबत पर्यटन विभागातील प्रमुख अधिकारी कुलदीप अरोलकर (व्यवस्थापकीय संचालक, जीटीडीली), दीपक नार्वेकर (उपमहाव्यवस्थापक, जीटीडीसी), राजेश काळे (उपसंचालक, पर्यटन विभाग), निवृत्ती पार्सेकर (वरिष्ठ अभियंता, जीटीडीसी), अमर हेबळेकर (फॉरेस्ट कॉर्पोरेशन) आणि विशेश नाईक (वरिष्ठ व्यवस्थापक, जीटीडीसी) उपस्थित होते.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, गोवा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि वेगळ्या ओळखीकरिता प्रसिद्ध आहे. भारतातील पहिले राज्य म्हणून आम्ही रिजनरेटिव्ह टुरिझम स्वीकारले आहे. पर्यटनातून अनुभव देताना निसर्ग, संस्कृती आणि वारसा जपणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आयटीबी आशिया ही आमची ही दृष्टी जगासमोर मांडण्यासाठी सर्वोत्तम संधी आहे.

पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले, गोव्याला विश्रांती, वेलनेस, साहस आणि एमआयसीई टुरिझमसाठी जागतिक दर्जाचे गंतव्यस्थान बनवणे हे आमचे ध्येय आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि संस्कृतीसह गोवा जगभरातील प्रवाशांचे स्वागत करण्यास तयार आहे.

जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप अरोलकर यांनी सादरीकरणाद्वारे गोव्याचे “गॅटवे टू ऑल पॉसिबीलीटीज” म्हणून स्थान अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की गोवा जबाबदार आणि समावेशक पर्यटनावर विश्वास ठेवतो, आर्थिक प्रगतीसोबत पर्यावरण आणि समाजाचे संरक्षण हीच खरी दिशा आहे.

पहिल्या दोन दिवसांत गोवा प्रतिनिधी मंडळाने सिंगापूर, फिलिपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, स्पेन, मॉरिशस, दुबई आणि तैवानमधील टूर ऑपरेटर्स, एजंट्स आणि माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली, ज्यातून नवीन आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधी निर्माण झाल्या. गोवा पॅव्हेलियनमध्ये कॉनकॉर्ड एक्झोटिक वोएजीय आणि मिनार ट्रॅव्हल्स गोवा सारख्या भागीदार कंपन्यांनी विविध पर्यटन अनुभव, विशेष प्रवास पॅकेजेस आणि योजनांचे प्रदर्शन केले.

गोवा टुरिझमने या मोहिमेत बीच आणि नाईटलाइफ पलीकडील गोव्याचे निसर्गप्रधान सौंदर्य दाखवले. त्यात निसर्गप्रेमींसाठी शांततेचे ठिकाण असलेले बोंडला प्राणी संग्रहालय व वन्यजीव अभयारण्य, समृद्ध जैवविविधता आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेले नेत्रावळी अभयारण्य, टिकाऊ व नैसर्गिक अनुभव देणारे इको-स्टे सिल्वन कॉटेजेस, भारतातील सर्वात सुंदर व उंच धबधबा व आंतरराष्ट्रीय आकर्षण असलेला दुधसागर धबधबा यांचा सहभाग होता.

२०२४ मध्ये गोव्याने १०.४ मिलियन पर्यटकांचे स्वागत केले, त्यात ९.९५ मिलियन देशांतर्गत आणि ०.४५ मिलियन आंतरराष्ट्रीय पर्यटक होते. पर्यटनातून राज्याच्या जीडीपी मध्ये १६.४% योगदान तर ३५% लोकसंख्येला रोजगार. दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे, क्रूझ टर्मिनल्स, रेल्वेमार्ग आणि महामार्ग यामुळे गोवा देश-विदेशासाठी सहज उपलब्ध झाला आहे.

गोवा राज्य आज विविध प्रकारच्या पर्यटनासाठी ओळखले जाते साहसी आणि किनारी पर्यटनात वॉटर स्पोर्ट्स, बंजी जंपिंग, कायकिंग, इको व हायटलँड पर्यटनात ६ अभयारण्ये, १ राष्ट्रीय उद्यान, होमस्टे व कारवान टुरिझम, संस्कृतिक वारश्यात कार्निवल, शिगमो, चीकलखलो यांसारखे उत्सव, वेलनेस व रोमँटिक डेस्टिनेशनात आयुर्वेद, योगा व रिसॉर्ट्स, खाद्यसंस्कृती व कलेत गोवन खाद्यपदार्थ, फ्ली मार्केट, इफ्फी आणि सॅरेन्डीपीटी आर्टस फेस्टीवल.

विश्रांतीसाठी येणारे प्रवासी असोत, साहस शोधणारे तरुण, योगा आणि वेलनेस रिट्रीटमध्ये सहभागी होणारे किंवा एमआयसीई आणि चित्रपट पर्यटनाचे व्यावसायिक गोवा सर्वांसाठी काहीतरी खास देतो.

गोवाचे रिजनरेटिव्ह टुरिझम मॉडेल हे दाखवते की पर्यटन केवळ अर्थार्जनासाठी नसून समाज आणि निसर्गाचा विकास साधणारे साधनही ठरू शकते. आयटीबी आशिया २०२५ मध्ये गोव्याचा सहभाग हा जागतिक पर्यटन नकाशावर आपली उपस्थिती अधिक मजबूत करणारा आणि जगाला शाश्वत पर्यटनाचा नवा मार्ग दाखवणारा ठरला आहे.