- म्हापशात श्री हनुमान नाट्यगृहाचे उद्घाटन
गोवा खबर : गोव्याची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी सरकार वचनबद्ध असून राज्यातील सांस्कृतिक स्थळांना सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. त्यांनी म्हापशातील नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री हनुमान नाट्यगृहाचे उद्घाटन केले.
सुमारे ७५० आसन क्षमतेच्या या नाट्यगृहात वातानुकूल व्यवस्था, आधुनिक प्रकाशयोजना आणि दर्जेदार ध्वनी प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रसंगी उपसभापती जोशुआ डिसोझा, खासदार सदानंद शेट तानावडे, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, “स्वतःच्या संसाधनातून पुनरुज्जीवित केलेले हे नाट्यगृह गोव्याच्या संस्कृतीची ओळख टिकवणारे आहे.” उपसभापती डिसोझा यांनी समितीचे कौतुक करत या नाट्यगृहाला सरकारकडून अधिक पाठबळ मिळावे अशी मागणी केली.
या नाट्यगृहाने अनेक कलाकारांना व्यासपीठ दिले असून नव्या रूपात ते पुन्हा एकदा म्हापशातील सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.