गोवा खबर : गोमेकॉ आणि इतर सरकारी इस्पितळांवर दिवसेंदिवस वाढणारा ताण लक्षात घेता, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. “कर्मचाऱ्यांची कमतरता असूनही एकही रुग्ण स्ट्रेचरवर राहणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत, असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पॅलिएटिव्ह मेडिसिन सुविधा आणि उच्चस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
राणे म्हणाले, गोवा हे पॅलिएटिव्ह मेडिसिन क्षेत्रात पाऊल उचलणारे अग्रगण्य राज्य ठरत आहे. तेवा फार्मास्यूटिकल्सच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जात असून, भारतातील काही राज्यस्तरीय धोरणांपैकी गोव्याचे धोरण महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात 10 दिवसांत परिचारिका आणि डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, राज्यात सुमारे 100 रुग्णवाहिका आणि अनेक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. नोकरभरतीची प्रक्रिया सुरू असून काही फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे पाठविल्या आहेत.
राणे पुढे म्हणाले, डॉक्टर रात्रीच्या वेळीही ऑपरेशन करत आहेत. रुग्णांना उत्तम सेवा मिळावी आणि ते लवकर बरे व्हावेत, यासाठी आमचे सतत प्रयत्न सुरू आहेत.