Connect with us

गोवा खबर

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५च्या स्वागताला मिरामार बीचवर अॅक्सेसिबल बोर्डवॉकचे उद्घाटन

Published

on

Spread the love
  • दिव्यांग व्यक्तींना समुद्रकिनारा आणि पाण्यात अडथळामुक्त प्रवेशासाठी अॅक्सेसिबलिटी प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण

गोवा खबर : दिव्यांग व्यक्तींसाठी प्रवेशसुलभ व अडथळामुक्त पर्यटन स्थळे करण्याच्या उद्देशाने, गोवा सरकारने मिरामार बीचवर खास डिझाइन केलेल्या अॅक्सेसिबल बोर्डवॉकचे उद्घाटन केले. समुद्रकिनारा तसेच समुद्राच्या पाण्यातही सुलभपणे प्रवेश करता यावा या उद्देशाने मिरामार किनाऱ्यावर हा अॅक्सेसिबल बोर्डवॉक विकसित करण्यात आला आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी)द्वारे विकसित केलेली ही सर्वसमावेशक पायाभूत सुविधा ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ मध्ये सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींसाठी एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) द्वारे हाती घेतलेला आणि विक्रमी वेळेत पूर्ण झालेला हा प्रकल्प दिव्यांग व्यक्तींना समुद्रकिनाऱ्यावर आणि समुद्राच्या पाण्यात सुलभ व  सुरक्षित प्रवेश प्रदान करत असून, यामुळे मिरामार किनारा हा राज्यातील सर्वात समावेशक मनोरंजन स्थळांपैकी एक बनला आहे.

या सुविधेच्या उद्घाटन समारंभास माननीय समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, माननीय पर्यटन मंत्री रोहन खवंटे, दिव्यांगजन आयुक्त  गुरुप्रसाद पावसकर, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालक वर्षा नाईक, दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, जीटीडीसीचे सरव्यवस्थापक दीपक नार्वेकर, गाविन डायस, विश्वेश नाईक,  वागळे आणि इतर जीटीडीसी अधिकारी उपस्थित होते.

पर्पल फेस्ट दरम्यान सहभागी दिव्यांगजन प्रतिनिधींना किनारी पर्यटनाचा निर्भेळ, सुरक्षित आणि सुलभपणे आनंद उपलब्ध करण्यासाठी, तरंगत्या व्हीलचेअरदेखील उपलब्ध केल्या जाणार आहेत. गोव्याच्या सुलभ पर्यटन आणि समावेशक विकासाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण केल्याबद्दल मान्यवरांनी जीटीडीसी आणि समाज कल्याण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

या प्रसंगी बोलताना, फळदेसाई म्हणाले, मिरामार किनाऱ्यावरील या बोर्डवॉकचे उद्घाटन हे गोवा राज्याने अवलंबिलेल्या सर्वसमावेशकतेबाबतच्या अटल वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या माध्यमातून, आपण केवळ दिव्यांग व्यक्तींच्या भावना आणि क्षमतांचा उत्सव साजरा करत नाही, तर राज्यातील आमच्या विकासधोरणामध्ये प्रवेशसुलभता ही बाब कायमस्वरूपी, अंगीभूत बनेल याची निश्चितीही करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा उपक्रम सन्मान, समानता आणि कृतिशील सक्षमीकरणाचे प्रतीक आहे.

जीटीडीसीने दिव्यांगजनांसाठी हाती घेतलेल्या या प्रवेशसुलभ पर्यटन सुविधा विकास उपक्रमाबद्दल भाष्य करताना, पर्यटन मंत्री  रोहन खवंटे म्हणाले, गोव्यातील पर्यटन हे नेहमीच जगभरातील पर्यटकांसाठी संस्मरणीय अनुभव देणारे असे आहे, तसेच असा प्रत्येक पर्यटनानुभव हा प्रत्येक पर्यटकाला मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. ‘सर्वांसाठी पर्यटन’ या दृष्टिकोनातून विकसित मिरामार येथील हा बोर्डवॉक एक अभिमानास्पद टप्पा आहे. समुद्र किनाऱ्यावरील पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये प्रवेशसुलभतेच्या पैलूंचा एकात्मिक समावेश करून, आम्ही गोव्यातील पर्यटन सुविधा अधिक समावेशक, संवेदनशील आणि जागतिक स्तरावर प्रेरणादायी बनविण्याच्या दिशेने काम करत आहोत.

राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, मर्यादा आणि सहभाग या दोन घटकांना सांधणारा जोड म्हणजे सुगमता होय. समावेशकता हा काही उपकार नाही तर तो सर्वांसाठी प्रमुख अधिकार आहे, हा विचार मिरामार किनाऱ्यावर विकसित या अॅक्सेसिबल बोर्डवॉकच्या उद्घाटनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सादर करण्यात आला आहे. या सुविधेमुळे दिव्यांग व्यक्तींनाही सर्वांप्रमाणेच किनाऱ्यावर सौंदर्याचा आनंद घेता येईल. यामुळे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ खरोखरच अडथळामुक्त उत्सव ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५च्या माध्यमातून भारतासह आणि जगभरातील प्रतिनिधी, नवोन्मेषक आणि परिवर्तन घडवणारे प्रतिनिधी एका मंचावर येणार असताना, मिरामार किनाऱ्यावरील हा अॅक्सेसिबल बोर्डवॉक हा सर्वांसाठी सुलभता, प्रतिष्ठा आणि समान संधी या गोवा राज्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरणार आहे.