- ४ ऑक्टोबर रोजी काणकोणमध्ये राज्य दिव्यांगजन आयुक्त आणि APNA यांच्या सहकार्याने आयोजित पर्पल वॉकला प्रारंभ
- ८ ऑक्टोबर रोजी पणजीत सांगता
गोवा खबर : इथोज फाउंडेशनच्या संस्थापिका वास्तुविशारद गीता बालकृष्णन यांनी लोलये-काणकोण येथील एस. एस. आंगले उच्च माध्यमिक विद्यालयापासून १०० किलोमीटर अंतराची APNA ARCAUSE पर्पल वॉक गोवा हा पदयात्रा उपक्रम सुरू केला आहे. ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पणजी येथे होणाऱ्या बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५च्या पूर्वसंध्येला म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी या पदयात्रेची सांगता पणजीमध्ये होणार आहे.

काणकोण येथे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री रमेश तवडकर, माननीय समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. एस.एस. आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेच्या आरंभी टप्प्यामध्ये विद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारीवृंद सहभागी झाला होता. भारतातील समावेशकतेचा प्रमुख उत्सव म्हणून ओळख असलेल्या पर्पल फेस्टच्या भावनेशी जोडली जात असल्याने या पदयात्रेला विशेष महत्व आहे. या पदयात्रेदरम्यान प्रत्येक टप्प्यावर त्या त्या भागातील विद्यार्थी, नागरिक, यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि प्रवेशसुलभता, सर्वसमावेशकतेच्या विचाराची शिदोरी त्यांना देणार आहेत. या माध्यमातून संवाद वाढीसाठी आणि विचारांची देवाणघेवाण वाढविण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

या पदयात्रेस प्रारंभावेळी क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री रमेश तवडकर म्हणाले: “प्रतिबद्धता आणि सहकार्य या बाबी प्रवेशसुलभतेला कशा प्रकारे दर्शनीय आणि मूर्तरूप द्यावे याचे उल्लेखनीय उदाहरण म्हणजे पर्पल वॉक गोवा १०० आणि आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट हे उपक्रम होत. सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये समावेशक डिझाइनला प्राधान्य देण्यासाठी हे उपक्रम आपल्या सर्वांना प्रेरणा देतात. प्रवेशसुलभता हा जीवनाचा आवश्यक पैलू आहे हा विचार अशा उपक्रमांद्वारे आपण सगळ्यांना पुन्हा पुन्हा जाणीव करून देतात.”
वॉक फॉर आर्काजच्या या सहाव्या पदयात्रा उपक्रमात गीता सहभागी झाल्या आहेत. या पदयात्रा उपक्रमातून त्यांनी १३हून राज्यांमधून एकत्रितपणे २,६०० किमी पेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आहे. वास्तुकलेचे महत्व लोकांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी घेतलेला वसा याचे प्रतीक म्हणून, तसेच समावेशकता, शाश्वतता आणि रचनाकृतींना न्याय देणे (डिझाइन जस्टिज) या बाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चा घडविण्यासाठी उत्प्रेरक म्हणून या पदयात्रा उपक्रमाची कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका राहिली आहे याचे अनुभव गीता यांनी १७०० इन ७० या आपल्या पुस्तकामध्ये मांडले आहेत.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, “पर्पल वॉक गोवा १०० या उपक्रमामधून पदयात्रेच्या मार्गावर विविध समुदाय, विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले जात असून, याद्वारे संवाद साधण्यासाठी, नवा विचार अनुभवण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.”
वास्तुविशारद गीता बालकृष्णन म्हणाल्या, “चालत राहिल्यामुळे आपण धकाधकीतून काहीसे मुक्त होतो. विविध अनुभव घेण्यासाठी, लोकांशी संवाद साधण्यासाठी, जग एका विशाल दृष्टिकोनातून पाहण्याची संधी अशा प्रकारच्या पदयात्रेतून, चालण्यातून मिळत राहते. पर्पल वॉक गोवा १००च्या माध्यमातून, युनिव्हर्सल डिझाइनसाठी सामूहिक वचनबद्धता जागृत करण्याचा माझा प्रयत्न आहे. कोणीही मागे राहणार नाही आणि प्रत्येक स्थान हे प्रतिष्ठा आणि आपलेपणा सादर करते ही भावना युनिव्हर्सल डिझाइनचा गाभा आहे.”
इंटरनॅशनल पर्पल फेस्ट हा समावेशकतेचा उत्सव आहे. पदयात्रेसारख्या उपक्रमांच्या आयोजनातून समावेशकतेचा हा विचार गोव्यातील रस्त्यांवर, किनाऱ्यांवर, सार्वजनिक ठिकाणी सर्वदूर, तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी गती मिळते. प्रवेशसुलभता हा मुद्दा म्हणजे केवळ दानधरमाची बाब नाही, तर हा मुद्दा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.
एशिया-पॅसिफिक नेटवर्क फॉर अॅक्सेसिबिलिटी (APNA) च्या सहयोगाने आयोजित हा उपक्रम समावेशक जीवनासाठी आवश्यक तत्त्वे असलेल्या युनिव्हर्सल डिझाइन आणि प्रवेशसुलभता या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकतो.
इंटरनॅशनल पर्पल फेस्टचा एक भाग म्हणून आयोजित या पदयात्रा उपक्रमातून विविध शासकीय संस्था, व्यावसायिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि जागतिक भागीदारांना एकत्र आणत आहे. यामध्ये दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग, संयुक्त राष्ट्रसंघ, आर्किटेक्चर कौन्सिल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स- गोवा चॅप्टर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स- गोवा सेंटर, झेरोधाची रेनमॅटर फाउंडेशन आदी संस्थांचा सहभाग राहिला आहे.
राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले: “अशा प्रकारच्या सहयोगी प्रयत्नांतून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य ठरलेल्या सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत असलेले मूलभूत तत्त्व म्हणून प्रवेशसुलभतेचे महत्त्व बळकट होते. सुलभ आणि समावेशक समाज निर्माण करणे ही केवळ धोरणकर्त्यांपुरतीच जबाबदारी नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाची, प्रत्येक नागरिकाची यामध्ये मोठी जबाबदारी आहे. नेमका हा अपेक्षित बदल घडवून आणण्याचे प्रयत्न गीता राबवत आहेत.”
संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे सह-आयोजित केलेल्या यंदाच्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टमध्ये प्रवेशसुलभतेला बळकटी देण्याच्या प्रयत्नांना गती देण्याची कटिबद्धता निश्चित केली आहे. युनिव्हर्सल डिझाईनमुळे लोकांच्या जीवनात कसा व्यापक, प्रभावी व सकारात्मक बदल घडू शकतात हा अनुभव सादर करण्यासाठी या महोत्सवादरम्यान आयोजित सुलभ मनोरंजन कार्यक्रम, चित्रपट प्रदर्शन, कला प्रदर्शन, कार्यशाळा आणि सार्वजनिक सहभाग अशा विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. समावेशकतेचा पुरस्कार करणारा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट हा महोत्सव गोव्याला सुलभता आणि समावेशकतेचे राष्ट्रीय केंद्र म्हणून सादर करत आहे. गोवा राज्य आणि राज्यातील नागरिक प्रत्येकाचे आनंदाने स्वागत करतात, ही बाब या महोत्सवातून जगासमोर प्रभावीपणे मांडली जात आहे.