गोवा खबर : मोबोर बीचजवळील खडकाळ नदीमुख भागात भरकटलेल्या ट्रॉलरमधून 27 मच्छीमारांना वाचवण्याच्या मोहीमेत निर्भीडपणे भाग घेतलेल्या दृष्टीचे लाइफसेव्हर्स आणि स्थानिक मच्छीमारांच्या वेगवान आणि धाडसी कृतीचे गोवा पर्यटन विभागाने मनापासून कौतुक केले आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा ही घटना घडली.
माननिय पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते आणि पर्यटन संचालक केदार नाईक यांच्या उपस्थितीत पर्यटन भवनात आज या लाइफसेव्हर्सचा त्यांच्या शौर्य व समर्पणाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
अवघड परिस्थिती असूनही लाइफसेव्हर्सनी तत्काळ प्रतिसाद देत ट्रॉलरवर संपूर्ण रात्र लक्ष ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व 27 मच्छीमारांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. त्यांच्या जबाबदारीची भावना आणि टीमवर्कमुळे एक मोठी दुर्घटना टळली आणि गोव्याच्या सुरक्षा व्यवस्थेची तयारी पुन्हा अधोरेखित झाली.
ही घटना रात्री उशिरा घडली. स्थानिक रहिवाशाने ट्रॉलर भरकटत असल्याची माहिती दिल्यावर ड्युटीवर नसलेले लाइफसेव्हर्सही त्वरित सक्रिय झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी समन्वयित बचाव मोहिम राबवली गेली आणि बॅकअप टीम, जेटस्की आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने सर्व मच्छीमारांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात आले.
या यशस्वी मोहिमेत विशेष कामगिरी बजावणाऱ्या लाइफसेव्हर्समध्ये लवु गांवकर, समीर गांवकर, सतीश गांवकर, पुनू वेळीप, शशिकांत जाधव, पंकज भुते, मेघराज जुवटकर, सुनील वेळीप आणि विशाल वेळीप यांचा उल्लेखनीय सहभाग होता.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, “ही बचाव मोहिम आमच्या लाइफसेव्हर्स आणि स्थानिक समाजाच्या शौर्य व बांधिलकीचे उदाहरण आहे. त्यांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन 27 जीव वाचवले. असा सामूहिक भाव गोव्याची खरी ओळख आहे आणि यामुळेच सुरक्षा व सेवेसाठी आमची बांधिलकी अधिक दृढ होते.”
पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, “या मोहिमेत दाखवलेला व्यावसायिकपणा आणि प्रसंगावधान गोव्याच्या लाइफसेव्हिंग नेटवर्कची ताकद दाखवते. या कार्यात सहभागी सर्व लाइफसेव्हर्स आणि स्थानिक मच्छीमारांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”
दृष्टी लाइफसेव्हिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी नविन अवस्थी म्हणाले, “आमचे लाइफसेव्हर्स कोणत्याही वेळी आणीबाणीला सामोरे जाण्यास प्रशिक्षित आहेत. या घटनेत त्यांनी पुन्हा एकदा जीव वाचवण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुरावा दिला आहे. त्यांच्या धैर्य आणि तत्परतेबद्दल आम्हाला अभिमान आहे. बीच पोलिस आणि स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्यामुळे ही मोहिम यशस्वी झाली आणि सर्व मच्छीमार सुखरूप घरी परतले.”
पर्यटन विभागाने या यशस्वी बचाव मोहिमेत सहभागी सर्वांचे धैर्य आणि समर्पणाबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जीव सुरक्षित ठेवण्याच्या आपल्या बांधिलकीची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे.