गोवा खबर : भारताची क्रिएटिव्ह कॅपिटल होण्याचे स्वप्न बाळगणारा गोवा आज तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचे केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. सध्या गोव्यात डीपीआयआयटी मान्यता प्राप्त ६९६ स्टार्टअप्स आहेत, जे देशातील प्रति व्यक्ती प्रमाणात सर्वाधिक मानले जातात.
गोव्याच्या स्टार्टअप इकोसिस्टमच्या प्रगतीला आणखी गती देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभागाने (डीआयटीई एन्ड सी) ‘गोवा स्टार्टअप पॉलिसी २०२५ जाहीर केली आहे. या धोरणाचा उद्देश उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, नव्या तंत्रज्ञानाला चालना देणे आणि गोव्याला नवकल्पना, स्टार्टअप्स आणि सर्जनशील व्यावसायिकांचे केंद्र म्हणून स्थापित करणे हा आहे.
२०२८ पर्यंत गोव्याला अग्रगण्य स्टार्टअप स्थळ बनवण्याच्या दृष्टीने या पॉलिसीत स्पष्ट उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत :
- १,००० स्टार्टअप्स स्थापन करणे
- १०,००० गोव्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे
- १०० स्टार्टअप्सना व्हेंचर फंडिंग मिळवून देणे
- ५० स्टार्टअप्ससोबत शासनाचे सहकार्य घडवून आणणे
- तसेच इन्क्युबेटर्स, अॅक्सेलरेटर्स, मार्केट स्पेस, उद्योजक, उद्योग, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था आणि शासन विभागांबरोबर भागीदारी निर्माण करणे

माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली गोवा उद्योजकतेची भावना मुळापासून जोपासत आहेत. या धोरणाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कॅम्पस इनोव्हेशन स्कीम द्वारे विद्यार्थी जे उद्योजकीय किंवा संशोधन आधारित प्रकल्प करतात, त्यांना प्रकल्पाच्या खर्चाची परतफेड करून ग्रांट्स दिले जातील.
याशिवाय, स्किल एन्हान्समेंट स्कीम अंतर्गत एआय आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा खर्च परत केला जाईल. तसेच खासगी संस्थांच्या सहकार्याने शैक्षणिक संस्था व औद्योगिक पार्कमध्ये आयटी लॅब्स, मेकर लॅब्स, सेंटर ऑफ एक्सलन्स आणि इनोव्हेशन सेंटर्स सुरू करण्यास मदत केली जाईल.
महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी विशेष मेंटोरिंग व फंडिंग प्रोग्रॅम राबवला जाईल. नवकल्पनात्मक प्रकल्पांवर काम करणाऱ्या महिलांच्या स्टार्टअप्सना मासिक भत्ताही दिला जाईल. त्याचप्रमाणे, प्रमोशन आणि मार्केटिंग सहाय्य योजने अंतर्गत सरकार प्रायोजित प्रदर्शन व मेळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात खर्चाची परतफेड केली जाईल.
गोवा स्टार्टअप पॉलिसी २०२५ ही अशी परिसंस्था उभारत आहे जी नव्या पिढीतील नेते आणि क्रिएटर्स घडवेल. नवकल्पना आणि उद्योजकता फुलवण्याची ही दूरदृष्टी गोव्याला जागतिक स्तरावर सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र बनवेल. आणि भारताची खरी क्रिएटिव्ह कॅपिटलम्हणून गोव्याला नवे स्थान मिळवून देईल.