गोवा खबर : वर्षअखेरीस सुरू होणाऱ्या पर्यटन हंगामाला आज उत्साहात सुरुवात झाली. रशियातील नोव्होसिबिर्स्क येथून आलेली पहिली चार्टर फ्लाइट मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. या ऐतिहासिक घटनेतून आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा गोव्यावरील विश्वास, सुरक्षित व जागतिक दर्जाचे स्थळ म्हणून पुन्हा अधोरेखित झाले.
स्वागत समारंभात पारंपरिक गोमंतकीय आदरातिथ्य दाखवण्यात आले. समई नृत्य, घोडेमोडणी, धनगर नृत्य, ब्रास बँड आणि फुलांनी स्वागत अशा सादरीकरणांनी गोव्याची संस्कृती व उबदारपणा पाहुण्यांसमोर मांडण्यात आला.
या प्रसंगी पर्यटन संचालक केदार नाईक, उपसंचालक जयेश काणकोणकर, सहायक पर्यटन अधिकारी चित्रा वेंगुर्लेकर, कॉनकॉर्ड एक्झॉटिक व्हॉयेजेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष शेख इस्माईल, तसेच मिनार ग्रुप चे उपाध्यक्ष शुबर्ट रेनाल्ड कोलासो यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
या हंगामात नोव्होसिबिर्स्कहून तीन नवीन साप्ताहिक फ्लाइट्स मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार आहेत. याशिवाय, येकाटेरिनबर्ग व मॉस्को येथून येणाऱ्या विद्यमान फ्लाइट्समुळे एअरोफ्लोटचे एकूण नऊ फ्लाइट्स दर आठवड्याला होणार आहेत, ज्यातून गोव्यावरील मोठ्या मागणीचे चित्र स्पष्ट होते.

• दुसरी १५८ प्रवाशांची चार्टर फ्लाइट नोव्होसिबिर्स्कहून ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:०० वाजता उतरणार आहे.
• येकाटेरिनबर्ग वरून बी७३७-८०० फ्लाइट्स प्रत्येकी १५८ प्रवाशांसह ४ ऑक्टोबर (सकाळी ६:०५) व ५ ऑक्टोबर (सकाळी ८:०५) रोजी येणार आहेत.
• तर मॉस्कोहून मोठी ए३३०-३०० फ्लाइट (२९६ प्रवासी) ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजता गोव्यात येईल.
रशियाच्या पलीकडे, गोव्याची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे कारण कझाकस्तानहूनही चार्टर फ्लाइट्स २५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहेत.
या विस्तारित नेटवर्कमुळे वर्षाअखेरीस आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, स्थानिक व्यवसाय यांना चालना मिळून रोजगार आणि आर्थिक संधी वाढतील.
माननिय पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, गोवा नवीन पर्यटन हंगामाचे स्वागत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पहिली चार्टर फ्लाइट आल्याने गोवा एक जागतिक दर्जाचे प्रमुख गंतव्य असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. सुरक्षा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि अनोख्या अनुभवासह आम्ही प्रत्येक पर्यटकाला गोव्याच्या पाहुणचाराची जाणिव करून देउ अशी खात्री देतो.
पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले, “पहिल्या चार्टर फ्लाइट्सच्या आगमनामुळे गोव्याची कनेक्टिव्हिटी अधिक बळकट झाली आहे. या वाढीमुळे हॉस्पिटॅलिटीपासून ट्रान्सपोर्टपर्यंत पर्यटन क्षेत्रातील स्थानिक घटकांना नवी संधी मिळेल आणि पर्यटनाचे फायदे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचतील.
पर्यटन विभाग उद्योगातील सर्व भागधारकांसोबत काम करत आहे, जेणेकरून प्रत्येक फ्लाइटचे स्वागत व्यवस्थित पद्धतीने होईल, प्रवाशांना चांगल्या सेवा मिळतील आणि खऱ्या अर्थाने गोव्याने केलेले स्वागत अनुभवता येईल. २०२५–२६ चा चार्टर हंगाम आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत शाश्वत व सर्वसमावेशक विकास करेल, अशी अपेक्षा आहे.