गोवा खबर : गोव्याचा समृद्ध वारसा आणि शाश्वततेसाठीची झटपट आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 28 सप्टेंबर रोजी पणजीतील ईएसजी कॉम्प्लेक्समध्ये हेरिटेज फॉर सस्टेनेबिलिटी फिल्म फेस्टिव्हलमध्ये १३ चित्रपट आणि माहितीपट सादर होणार आहेत. लेखिका, संवर्धक आणि हेरिटेज फर्स्ट गोवाच्या संचालिका हेता पंडित यांनी हा फेस्टिव्हल क्युरेट केला आहे. TTAG आणि SKAL International Goa यांच्या सहयोगाने आणि गोवा टुरिझमच्या पाठबळाने आयोजित हा एकदिवसीय महोत्सव वर्ल्ड टुरिझम डेच्या राज्यस्तरीय सोहळ्याची सांगता करणार आहे.
प्र. हेरिटेज फॉर सस्टेनेबिलिटी फिल्म फेस्टिव्हल मागची प्रेरणा काय होती?
उत्तर (हेता पंडित): काही काळापासून गोव्याच्या नैसर्गिक वारशावर आणि गावजीवनावर आधारित चित्रपट आम्हाला मिळत होते. गेल्या वर्षभर आम्ही हॅरीटेज वॉक आणि कार्यशाळा केल्या. तसेच ‘वॉक विथ अ लिजेंड’ या मालिकेत गोव्याच्या दिग्गज व्यक्तींशी त्यांच्या गावातून पायी चालत त्यांच्या बालपणाच्या आठवणी उलगडल्या. या फेस्टिव्हलला त्या प्रवासाची नैसर्गिक पुढची पायरी म्हणता येईल. काही चित्रपट वारशाच्या नाजूक संतुलनावर प्रकाश टाकतात तर काही बदलत्या काळाचे सत्य मांडतात.
प्र. चित्रपट आणि दिग्दर्शक निवडताना कोणता हेतू होता?
उत्तर: सर्व चित्रपटांचा धागा एकच, गोव्याचा अमूल्य वारसा. ‘हेरिटेज फॉर सस्टेनेबिलिटी’ या संकल्पनेशी जुळणारे चित्रपट निवडले. वारसा आणि शाश्वतता हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. एखादी गोष्ट वाचवायची असेल तर आधी तिच्यावर प्रेम करावे लागते, आणि प्रेम करण्यासाठी तिला ओळखणे आवश्यक आहे. हा फेस्टिव्हल म्हणजे आपल्या वारशाला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा प्रयत्न आहे.

प्र. हा फेस्टिव्हल वर्ल्ड टुरिझम डे सेलिब्रेशनचा भाग आहे. वारसा आणि शाश्वततेवर चित्रपट कसा उपयोगी ठरतो?
उत्तर: चित्रपट, शॉर्ट फिल्म्स आणि माहितीपट हे कहाणी सांगण्याची ताकदवान साधने आहेत. अशा फेस्टिव्हलमुळे दिग्दर्शक वारसा जपण्याच्या समान ध्येयाने एकत्र येतात. TTAG, SKAL International Goa आणि गोवा टुरिझमच्या सहयोगामुळे हा संदेश अधिक प्रभावी होतो आणि तो थेट गोव्याच्या पर्यटन कथानकाचा भाग बनतो.
प्र. गोमंतकीय दिग्दर्शक वारसा, पर्यावरण आणि अस्मिता याबाबत जनजागृती कशी घडवू शकतात?
उत्तर: जागरूकता एका दिवसात तयार होत नाही. कधी क्षणात बदल घडतो, तर कधी दशकोनदशकं लागतात. आपलं काम म्हणजे प्रयत्न सुरू ठेवणं. आपली निष्ठा खरी असेल तर इतर लोकांनाही आपण बदलू शकतो.
प्र. TTAG, SKAL International Goa आणि गोवा टुरिझमसोबतच्या सहयोगातून कोणता संदेश जातो?
उत्तर : दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात, पण फार थोडेच लोक गोव्याचं खरं रूप समजून घेतात. अनेकांना गोवा अजूनही फक्त पार्टी डेस्टिनेशन वाटतं. या सहयोगातून आपण ती धारणा बदलू शकतो आणि गोव्याला वारसा, संस्कृती आणि शाश्वततेची भूमी म्हणून दाखवू शकतो.
हेरिटेज फॉर सस्टेनेबिलिटी फिल्म फेस्टिव्हल हे केवळ चित्रपटांचं प्रदर्शन नाही, तर विचारमंथन, संवाद आणि गोव्याला नव्याने शोधण्याचं निमंत्रण आहे. हेता पंडित यांच्या शब्दांत, “एखादी गोष्ट जपायची असेल तर तिला आधी ओळखा, मग तिच्यावर प्रेम करा. आणि जेव्हा आपण प्रेम करतो, तेव्हाच आपण तिचे संवर्धन करू शकतो.”